कोकणातल्या शेतकर्यांचा नुकसानीचा पंचनामा करून राज्य सरकारने नुकसानभरपाई द्यावी – सुनिल तटकरे
कोकणातील मुख्य पीक म्हणजे भात शेती. रत्नागिरी जिल्ह्यात ७७ हजार हेक्टरवर भातशेती केली जाते. तर यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात भात व नागली पिकाची लागवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पण, सध्या पावसाने कोकणात थैमान घातले असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळेच अनेक ठिकाणी झालेल्या पावसाने भातशेत आडवे झाले आहे. मात्र नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्यांना अद्याप सुरवात झालेली नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी खंत व्यक्त केली आहे.
नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे व्हावेत अशी मागणी गेले आठ दिवस शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याबाबतचे कोणतेही आदेश कृषी विभागाला देण्यात आलेले नाहीत. कोकणात सध्या पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांत कोसळणाऱ्या पावसाने भात शेतीची दाणादाण उडवून टाकली आहे. या पावसामुळे सध्या भातशेतीवर करपा आणि भुंगा रोगाचा प्रदुर्भाव झाला असून, त्यामुळे हातातोंडाशी आलेले भात पिकाचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हळव्या भाताचे पीक घेतात. हे पीक आठ दिवसांपूर्वीच कापणीयोग्य झाले. काही शेतकऱ्यांनी कापणी सुरूही केली; परंतु पावसाने दोन दिवस कहर केल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले पीक वाहून गेले, तर अनेक ठिकाणी तयार पीक शेतातच आडवे झाले. कोकणातल्या शेतकर्यांचा विचार करून राज्य सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
