थकबाकी भरा, वीज खंडित करण्याची कारवाई टाळा
रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार
पुणे, दि. 17 : वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांच्या थकबाकीचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र रविवारी दि. 18 मार्चला सुरु राहणार आहे.
पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगाने सुरु आहे. ग्राहकांना वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी रविवारी दि. 18 मार्चला सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. याशिवाय चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र तसेच घरबसल्या बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
