मनाला भिडणाऱ्या कवितेतून ‘होम स्वीट होम’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Home-sweet-home-FB-cover.jpg
Share this News:

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोएक्टीव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याचा फर्स्ट लुक सोशल मिडीयावर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटातील नायक किंवा नायिकेचा चेहरा, गाणे या माध्यमातून सिनेमाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर येतो मात्र या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच घराचे रेखाचित्र आणि घरावरची एक सुंदर कविता असा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.

‘होम स्वीट होम’च्या फर्स्ट लुक मध्ये शहरातील प्रशस्त इमारतीमधील आणि गावातील एक जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर कविता आहे ती सुद्धा त्यांच्याच आवाजात कवितेत घर,आसपासचे दरी डोंगर, घराचा उंबरठा, अंगण, सभोवतालची हिरवळ, त्रिकोणी छप्पर, काटेरी कुंपण असे सहज सुचणारे साधे – सोपे शब्द मनाला अलगद भिडणारे आहेत. यामुळे ही कविता आणि वैभव जोशी यांचा आवाज पुन्हा – पुन्हा ऐकावासा वाटतो.

हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर, विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. अनेक कलाकारांनी ‘होम स्वीट होम’चा फर्स्ट लुक आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार आहेत? आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे? हे जाणून घेण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.

घर आणि त्याचे घरपण हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातील एका घराची प्रतिमा दडलेली असते. कुणाला घर म्हणून प्रशस्त इमारतीमध्ये फ्लॅट हवा असतो, तर कुणाला घरासमोर अंगण हवं असतं. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं. या हटके फर्स्ट लुकला सोशल मिडीयावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘होम स्वीट होम’ बघण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र चित्रपटगृहात प्रवेश करणार हे निश्चित.