रंगली गायिकांच्या हिंदी युगूल गीतांची ‘कजरा मोहब्बतवाला’ मैफल
पुणे :
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या वतीने हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या ‘कजरा मोहब्बतवाला ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये महिला गायक – वादक कलाकारांनी जुन्या हिंदी चित्रपटातील स्त्री युगल गीतांची मैफल रंगवली.
‘सूर सखी ‘संस्थेद्वारे हा कार्यक्रम ‘गाणी दोघींची-आवड सगळ्यांची’ अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन सादर केला गेला . स्त्री युगुल गीतांच्या दालनातली ही सुरीली सफर भरभरून आनंद देणारी ठरली. यात रसिकांनी जुन्या अजरामर गीतांचा आस्वाद घेतला.
‘सांस्कृतिक प्रसार योजनेंतर्गत हा ५० वा, सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम होता, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविकात दिली .
‘भारतीय विद्या भवन’ च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची निर्मिती मानिनी गुर्जर यांची होती. संकल्पना, निवेदन रंजना काळे यांचे होते. मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे यांनी गीते सादर केली. संपदा देशपांडे, उमा जटार, किमया काणे, उर्मिला भालेराव, भावना टिकले, शिल्पा आपटे यांनी साथसंगत केली.
या कार्यक्रमात अनेक संगीतकारांच्या रचना सादर करण्यात आल्या. जुन्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील गायिकांनी गायलेली अजरामर स्त्री द्वंद्व गीते या कार्यक्रमात सादर केली.
१८ गीतांचे सादरीकरण झाले. यामध्ये ‘चूप चूप खडे हो’, ‘अपलम चपलम’, ‘रेशमी सलवार’, ‘जानू जानू री’, ‘ओ चाँद जहाँ वो जाए’, ‘मन क्यूंँ बहका’, ‘तेरी महफील में’, ‘कोई आएगा, हमरे गाव कोई आएगा ‘ गाण्यात वाढवा, ‘ निगा हों से दिल का पैगाम आया है ‘ , ‘ आँखिया भूल गयी सोना ‘, ‘ गोरे गोरे, ओ बांके छोरे ‘ अशी लोकप्रिय गीते आणि शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या काही गाण्यांचाही यात समावेश होता. या गीतांमुळे श्रोते स्मरणरंजनात रमले.
शास्त्रीय संगीतावर आधारित संपूर्णपणे महिला कलाकारांनीच सादर केलेला असा हा सुरेल कार्यक्रम होता. यात सहभाग असलेल्या सर्व महिला आपापल्या क्षेत्रात पदवीधर व उच्च पदवीधर असून, संगीत क्षेत्रातही उत्कृष्ट व सर्व परिचित अशा आहेत. हा कार्यक्रम दृक-श्राव्य पद्धतीने सादर करण्यात आला.
सुवर्णकाळातील वसंत देसाई, सी. रामचंद्र,एस.डी. बर्मन यांच्यापासून नौशाद यांच्यासारख्या संगीतकारांचे संगीत असलेली गीते सादर झाली. लता -आशा, लता -अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम – अशा अनेक गायिकांची गीते रसिकांना मोहवून गेली
