राज्यभरातील बहुतेक भागांत आता 24 तासांत नवीन वीजजोडणी मिळणार
मुंबई, दि. 12 : नवीन वीजजोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल अॅपच्या सहाय्याने केवळ 24 तासांत वीजजोडणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे. राज्यभरातील महावितरणच्या 36 मंडलांतर्गत 88 विभागांच्या निवडक कार्यक्षेत्रांचा यात समावेश आहे.
महावितरणने निर्माण केलेल्या मोबाईल अॅपद्वारे आता ग्राहकसेवेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. आतापर्यन्त राज्यात जुलै 2016 पासून 1228 ग्राहकांना 24 तासांत वीजजोडणी देण्यात आली आहे. आता या योजनेला गती मिळत असून ग्राहकांकडूनही अधिक प्रतिसाद मिळत आहे.
ज्या भागात नवीन वीजजोडणीसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा भागातील तब्बल 150 पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात महावितरणकडून ग्राहकाला 24 तासांत नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. याबाबत संबंधित परिमंडल, मंडल, विभाग व उपविभाग, शाखा कार्यालये यांची नावे महावितरणच्याwww.mahadiscom.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द केलेली आहेत.
घरगुती आणि वाणिज्यिक वर्गवारीच्या सिंगल किंवा थ्री फेजच्या नवीन वीजजोडणीसाठी संबंधित ग्राहकाची थकबाकी नसल्यास व दिलेल्या फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास 24 तासांत संबंधित ग्राहकाला वीजजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन जोडणीसाठी इंटरनेटवरील www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारेही अर्ज स्वीकारणे सुरू आहे. महावितरणने वीजजोडणी देण्याची अंतर्गत कार्यवाही संपुर्णपणे ऑनलाईन करणे अधिकारी व कर्मचार्यांसाठी अनिवार्य केलेले आहे. तसेच नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया थेट वीजजोडणीच्या ठिकाणाहूनच करता यावी यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळें नवीन वीजजोडणीसाठी अर्ज प्राप्त होताच त्याबाबत कार्यालयीन, तांत्रिक व अन्य माहितीची नोंद महावितरणच्या प्रणालीत ऑनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचार्यांना या अॅपद्वारे शक्य झाली आहे.
