लोकअदालतीमध्ये आज जिल्ह्यातील वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

Share this News:

पुणे, दि. 11 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. 12) सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांना थकबाकीमुक्तीसोबतच नवीन वीजजोडणीची संधी उपलब्ध झाली आहे. लोकअदालतीमध्ये महावितरणकडून सध्या सुरु असलेल्या थकबाकीमुक्ती योजनेचाही लाभ देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या थकबाकीदारांची दाखलपूर्व प्रकरणे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 19(5)(2) अन्वये तातडीने अंतीम निकालासाठी ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा व सत्र सेवा न्यायालयाच्या वतीने महावितरणच्या थकबाकीदारांना विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 25 (2) प्रमाणे नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यातील शिवाजीनगर (पुणे), पिंपरी, घोडेगाव, जुन्नर, खेड, वडगाव मावळ, बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, भोर व शिरूर येथील न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ या लोकअदालतीमध्ये सहभागी झालेल्या वीजग्राहकांना देण्यात येणार आहे. तसेच थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल व त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येईल.

या लोकअदालतीमध्ये तडजोड केल्यास थकबाकीदार वीजग्राहकांना पुढील कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या थकबाकीमुक्तीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.