32 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध तर 13 हजार वीजजोडण्या शिल्लक

Share this News:

पुणे, दि. 25 मार्च 2017 : पुणे परिमंडलात सिंगल व थ्री फेजच्या 13,778 नवीन वीजजोडण्या विविध कारणांमुळे प्रलंबित असून सद्यस्थितीत तब्बल 32,229 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. वीजमीटरअभावी नवीन वीजजोडण्यांना विलंब होत असल्याचा आरोप चुकीचा व बिनबुडाचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलात सिंगल व थ्री फेजच्या 13,778 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजजोडण्या देणे शिल्लक आहे व या वीजजोडण्या देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी केबल टाकणे, नवीन रोहित्र बसविणे किंवा रोहित्राची क्षमता वाढविणे आदी वीज वितरण यंत्रणेची कामे सुरु आहे. परंतु नवीन वीजजोडणी प्रलंबित राहण्यासाठी फक्त वीजमीटर उपलब्ध नसल्याचे एकमेव कारण असल्याची चुकीची माहिती वीजग्राहकांना देण्यात येत आहे. वस्तुस्थितीप्रमाणे पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्या देण्यासाठी सिंगल फेजचे 20,996 व थ्री फेजचे 11,233 असे एकूण 32,229 वीजमीटर सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच वीजग्राहकांकडील सदोष, नादुरुस्त तसेच जळालेले मीटर बदलण्यासाठी उपलब्ध असलेले वीजमीटर वापरण्यात येत आहे. याशिवाय येत्या आठवड्याभरात गणेशखिंड मंडल- 6500, रास्तापेठ मंडल – 5500 व पुणे ग्रामीण मंडलासाठी 6000 असे एकूण 18,000 नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहे.

भोसरी, पिंपरी, कोथरूड व शिवाजीनगर विभागाचा समावेश असलेल्या गणेशखिंड मंडलात 2818 थ्री फेजचे तर 5079 सिंगल फेजचे मीटर उपलब्ध आहेत तर घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना सिंगल व थ्री फेजचे 5669 वीजजोडण्या देण्यात येत आहेत. उर्वरित रास्तापेठ व पुणे ग्रामीण मंडलात सिंगल फेजचे 15,917 तर थ्री फेजचे 8415 वीजमीटर उपलब्ध आहेत. वीजमीटर नसल्यामुळे वीजजोडण्या प्रलंबित असल्याच्या चुकीच्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.