मुलगी होण्याच्या भीतीने विवाहितेचा छळ..

Share this News:

पुणे, दि. ४ जून : मुलगी होण्याच्या भीतीने पतीने पत्नीचा गर्भपात करून दुसरे लग्न केले. तर दिराने अश्लील वर्तन करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली असून पती, सासू-सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिला पहिली मुलगी झाल्यामुळे नाराज झालेल्या पतीने किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे करण्यास सुरुवात केली. पती तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला. पीडिता पुन्हा गर्भवती राहिली असता तिला मुलगीच होईल अशी भिती आरोपी पाटील वाटू लागली. त्याने पीडितेला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. पीडितेला कधीच मुलगा होणार नाही, अशी गैरसमजूत करून घेऊन तिच्या सासू-सासऱ्याने पतीचे लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिले. पीडितेच्या मर्जीविरुद्व तिच्या पतीने दुसरे लग्न केले, त्यामुळे पहिल्या पत्नीने पोलिसात तक्रार करू नये यासाठी सासू-सासरे आणि दीर तिला घटस्फोट घेण्यासाठी तगादा लावत छळत होते. छळाची परिसीमा इतकी वाढली कि, एकेदिवशी पीडितेच्या दिराने तिच्याशी अंगलट करून विनयभंग केला. तसेच झालेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता करू नये म्हणून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. त्यामुळे पीडितेने तिच्या आई व बहिणाला घडलेला सर्व प्रकार सांगून वाकड पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल केली. यामध्ये कौटूंबिक हिंसाचार, बालहत्या, महिलेचा विनयभंग, जबरी मारहाण करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता गाडे पुढील तपास करीत आहेत.

गुन्हा नोंदवून २४ तास होऊन गेले तरीहि अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी पुण्यातील अनेक संस्था, संघटना एकत्र येऊन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन समोरजोडे मारो आंदोलन” करणार आहेत.

छावा क्रांतिवीर संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा छाया खैरनार म्हणाल्या, पीडित भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. वाकड पोलिसांनी एफआयआर दाखल करून २४ तास उलटून गेले तरीदेखील अद्यापपर्यंत आरोपीना अटक केली नाही. त्यामुळे छावा क्रांतिवीर संघटना आरोपीविरुद्ध पोलीसस्टेशन समोर “जोडे मारो आंदोलन” करणार असल्याचे खैरनार म्हणाल्या.