सूर नवा ध्यास नवा – लिटिल चॅम्प्सच्या ऑडिशन्स पुण्यात
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा‘ हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा कार्यक्रमामधील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे “सूर नवा ध्यास नवा-लिटिल चॅम्प्स”. या पर्वामध्ये देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास सुरु होणार आहे ६ जुलै पासून. बच्चे कंपनीचे सुरेल गाणे ऐकायला महाराष्ट्र आतूर आहे. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये होणार असून याचे परीक्षक असणार आहेत अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदस्त्यात आहे.
“सूर नवा ध्यास नवा-लिटिल चॅम्प्स” या कार्यक्रमाची ऑडिशन्स पुण्यामध्ये ८ जुलै रोजी होणार आहे. ८ जुलै रोजी पुण्यातील डी. इ. एस. सेकंडरी स्कूल, सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत येणारे गायक किंवा गायिकाच निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबई ला बोलाविले जाईल.
