सीओईपी च्या टीम स्वयमची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरुदक्षिणा – अभाविप राष्ट्रीय सह्संघटन मंत्री

Share this News:
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगर आयोजित “छात्रगर्जना २०१६” दि. २८ जुलै २०१६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे उत्साहात संपन्न. सीओईपी च्या टीम स्वयम सह पुण्यातील ५० हून अधिक महाविद्यालयांतून विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. अभाविप चे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. श्रीनिवास व महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. राम सातपुते ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आनंद पुरोहित यांच्या मंत्री प्रतिवेदानाने झाली. अभाविप पुणे च्या गतवर्षीच्या कार्याचा लेखाजोखा यावेळी मांडला गेला.
श्री. श्रीनिवास यांच्या हस्ते टीम स्वयम ला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. या वेळी श्री. श्रीनिवास यांनी सीओईपी च्या विद्यार्थ्यांचे “सीओईपी च्या टीम स्वयमची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरुदक्षिणा” असे गौरवोद्गार काढून कौतुक केले. संपूर्ण देशाला आपला अभिमान आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतःतील संवेदना जागृत करून समाजातील समस्यांचे उत्तर शोधावे आणि देशाच्या सेवेसाठी आपले योगदान द्यावे. असेही ते त्यावेळी म्हणाले. कोपर्डी येथील घटनेचा तीव्र निषेध त्यांनी केला. अशा घटना होऊ नयेत यासाठी कठोर कायदा व त्याची अंमलबजावणी करावी व केवळ कायदा करून होणार नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याने महिला सन्मानासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
“खुल्या महाविद्यालयीन निवडणुका लवकरात लवकर सुरु कराव्यात” अशी मागणी प्रदेश मंत्री राम सातपुते यांनी केली.
या कार्यक्रमात अभाविप पुणे महानगर कार्यकारिणी, ७ भागांची कार्यकारिणी व ५० महाविद्यालय अध्यक्ष यांची घोषणा करण्यात आली.
अभाविप पुणे महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. प्रसाद कोरडे व मंत्री म्हणून श्री. प्रदीप गावडे यांची निर्वाचन अधिकारी प्रा. सुरेंद्र निरगुडे यांनी घोषणा केली. यावेळी प्रा. प्रसाद कोरडे व श्री. प्रदीप गावडे यांनी अभाविप पुणेच्या कार्याची आगामी दिशा स्पष्ट केली. विद्यार्थी हितासाठी अभाविप कायमच कटिबद्ध राहील. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही असेल. शिक्षणसम्राटांकडून होणारी विद्यार्थ्यांची लूट अभाविप खपवून घेणार नाही असे नवनिर्वाचित महानगर मंत्री श्री. प्रदीप गावडे यांनी सांगितले.