आंतरराष्ट्रीय पालक दिनानिमित्त डीपर, सर फाउंडेशनतर्फे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांना ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’

Share this News:
पुणे : जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा होणार्‍या आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ’महापालक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्कार यंदा जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीनासिंहजी यांना, तर ’संस्थापालक सन्मान’ पुरस्कार वरोरा येथील ज्ञानदा जीवन विकास केंद्राचे संस्थापक प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सौभाग्यलंकार असे महापालक सन्मानाचे, तर 51 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे संस्थापालक सन्मानाचे स्वरुप आहे. डीपर, सर फाऊंडेशन व ’तुम्ही-आम्ही पालक’ यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. दि. 21 व 22 जुलै 2018 रोजी कोथरूड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, जे पी नाईक सेंटर येथे होणार्‍या दोन दिवसीय कार्यक्रमात हे सन्मान प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती डीपर आणि सर फाऊंडेशन व साद माणुसकीची फाऊंडेशनचे संस्थापक हरीश बुटले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हरीश बुटले म्हणाले, संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या या कार्यक्रमात 21 जुलै 2018 रोजी संस्थापालक सन्मान व 22 जुलै 2018 रोजी आंतरराष्ट्रीय पालकदिनी महापालक राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जाणार आहे. महापालक सन्मान सोहळ्यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून, तर लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक कुकडे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. संस्थापालक सन्मान सोहळ्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. चारुदत्त आपटे प्रमुख अतिथी म्हणून, तर माजी आमदार उल्हासदादा पवार अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. याशिवाय, वैद्यकीय नीट व इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रथम येणार्या डीपरच्या विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त शिक्षक-कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रवींद्र कोल्हे, दिलीप अरळीकर, डॉ. राजाभाऊ दांडेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन, तसेच खेड्यांचे सर्वंकष मूल्यमापण करण्यासाठी तयार केलेल्या ‘साद ग्राम’ या अ‍ॅपचे अनावरण होईल.
कार्यक्रमात दोन्ही दिवशी विविध विषयांवर परिसंवाद आयोजिले आहेत. पहिल्या दिवशी सकाळी 10.30 ते 1.00 या वेळेत ’सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही खेडी स्वयंपूर्ण का नाहीत?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, ’जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर सहभागी होणार आहेत. दुपारी 4.15 वाजता उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. शुभांगी आणि डॉ. विनय कोपरकर या दाम्पत्याशी ’सहसंवाद : कृतार्थ सहजीवनाचा’ विषयावर गप्पा रंगणार आहेत. सायंकाळी 7.45 वाजता जुन्या हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दुसर्‍या दिवशी सकाळी 7.30 वाजता मार्गदर्शन व कार्यकर्ता संवाद होणार असून, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल परमार, दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन, रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे व सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर सहभाग घेतील. सकाळी 10.30 वाजता होणार्‍या ’ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान’ या सामाजिक विषयावरील परिसंवादात आदर्शग्रामचे अध्यक्ष पोपटराव पवार, मध्यप्रदेशातील नर्मदालयाच्या भारती ठाकूर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उदय वारुंजीकर, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. दुपारी 2.15 ते सायंकाळी 5.15 या वेळेत 200 कार्यकर्ता प्रशिक्षण होणार आहे, असे हरीश बुटले यांनी सांगितले.
——————————
डॉ. राजेंद्रसिंह व श्रीमती मिनासिंहजी यांच्याविषयी :
राजेंद्रसिंह हे भारतीय समाजसेवक व विख्यात पर्यावरणतज्ञ आहेत. ते जलपुरुष या नावाने ओळखले जातात. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1959 रोजी उत्तर प्रदेशमधील दौला, जि.बागपत येथे झाला. त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. पत्नी मीना यांच्यासह त्यांनी जलसंधारणाची देशव्यापी चळवळ उभी केली आहे. राणांनी राजस्थानमध्ये तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये जलसंधारणासाठी व मृ्द्संधारणासाठी लोकसहभागातून हजारो ’जोहड’ (कच्चे तलाव-बांध) निर्माण केले. त्यांनी भारतभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले आहे. राजस्थानातील सात नद्यांना पुनरुज्जीवित करून तेथील गावक-यांचे राहणीमान सुधरवण्यात मोलाचा वाट त्यांनी उचलला आहे. डॉ. राजेंद्रसिंह यांना 2001 सालच्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले. पाण्याच्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे सन 2015 चे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ राजेंद्रसिंह यांना मिळाले आहे. प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज सन्मान तसेच शेकडो पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.
—————————————-
प्रा. मधुकर उपलेंचवार यांच्याविषयी :
प्रा. मधुकर उपलेंचवार यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील हरसूल येथे झाला. त्यांनी पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी सहाय्यक समितीचे काम त्यांनी जवळून पाहिले होते. भौतिकशास्त्रातून एमएससी पूर्ण झाल्यावर त्यांनी 1971 साली वरोरा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना केली. आता संस्थेमध्ये 216 विद्यार्थी आहेत. 20 हजार पुस्तकांचे समृध्द ग्रंथालय, संगणक व प्रशिक्षण केंद्र, विज्ञान प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, कमवा व शिका योजना अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडण्याला हातभार लागत आहे. वयाच्या 80 वर्षी संस्थेला विश्वस्त भावनेने जागत पुढील कमान त्यांच्याच वसतीगृहतील विद्यार्थ्यांना त्यांनी सोपविली आहे.