कृषीपंपांच्या वीजदरात मोठी वाढ नाही केवळ 10 ते 15 टक्के वाढ
मुंबई, दि. 22 डिसेंबर, 2016 : कृषीपंपाच्या वीजदरांत 40 ते 90 टक्के दरवाढ होणार असल्याचे आरोप चुकीचे असून प्रत्यक्षात ही दरवाढ साधारणत: 9 ते 15 टक्के एवढी राहणार आहे.
मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार कृषीपंप ग्राहकांसाठी दरवाढ साधारणत: 4 ते 5 टक्के या प्रमाणात राहील, असे स्पष्ट केले आहे. परंतू, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ही वीज दरवाढ 40 ते 90 टक्क्यांपर्यंत राहील असा आरोप केला आहे. मा. आयोगाने प्रत्यक्षात मीटर असलेल्या सर्व लघुदाब कृषीपंपासाठी वीजदर रु. 2.58 प्रतीयुनिट वरुन रु. 2.94 प्रतीयुनिट असे लागू केले आहे. ही वाढ 13.95 टक्के एवढी आहे. तसेच विनामीटर कृषीपंपासाठी साधारणत: 9 ते 15 टक्के एवढी दरवाढ मा. आयोगाने मंजूर केली आहे. याशिवाय उपसा जलसिंचन योजनेसाठी 33 किव्हो आणि 66 किव्होचे वीजदर प्रत्यक्षात अनुक्रमे 2 ते 5 टक्के कमी झालेले आहेत तर 22/11 किव्होसाठी दरवाढ साधारणत: 19.5 टक्के एवढी आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे विद्युत अधिनियम- 2003, कलम 65 नुसार कृषीपंपधारक शेतकऱ्यांसाठी वीजदरात अनुदान देण्यात येते. अशा अनुदान दरात वहन आकाराचाही समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वीजदरात अनुदान देण्यात येते आहे. त्यानुसार सुधारित वीजदर लागू झाल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबतचा निर्देश अपेक्षित आहे.
