क्रांतीकारकांचे बलिदान देशवासियांना स्फुर्तिदायी – ॲड. वसंत कांबळे
पिंपरी (दि. 24 मार्च 2018) शहिद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या क्रांतीकारकांचे बलिदान तमाम देशवासियांना स्फुर्तिदायी व देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणारे ठरले, असे मार्गदर्शन ॲड. वसंत कांबळे यांनी केले. पिंपळे गुरव येथील गुरुशोभा सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. 23 मार्च) सायंकाळी सृष्टी हॉटेल चौकात शहिद दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रा. मुकेश पवार, तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, नयन अहिरे, सुनिल दिवाणजी, लक्ष्मी आदियाल, द्रोपदी रंधवे, दिपाकौर आदियाल, नितीन कदम, समशेर चौहान, सुशिल चव्हाण, रमा कांबळे, अंजू नखाते, सुजाता निकाळजे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, शिवलाल कांबळे, मुकेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. कांबळे म्हणाले की, 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुगांत सायंकाळी सात वाजता ब्रिटीश सरकारने या शहिदांना फाशी दिली. तुरुगांतील सर्व कैद्यांवर दहशत बसविण्यासाठी मुद्दाम सायंकाळी फाशी देण्यात आले. मात्र, सर्व कैद्यांनी न घाबरता ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देऊन संपुर्ण लाहोर शहर हादरवून सोडले. त्यांच्या बलीदानाने देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटला. 1928 मध्ये ब्रिटीश सरकारने नेमलेल्या साइमन कमिशनला देशभर काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला. साइमन कमिशन जेंव्हा लाहोरमध्ये पोहचले. तेंव्हा पंजाब केसरी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली तीव्र विरोध करण्यात आला. इंग्रजांनी हा विरोध मोडून काढण्यासाठी जमावावर लाठीचार्ज केला. यात लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदूस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी’ची स्थापना करण्यात आली. यातूनच शहिद राजगुरु यांनी पोलीस सुपरिडेंटवर गोळी चालविली. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या तीनही शहिदांच्या अनुपस्थितीत खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाच्या विरोधात देशभर आंदोलने, उपोषण करण्यात आले. भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणा-या या क्रांतीकारकांमुळे देशभरातील युवकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि 16 वर्षांनी 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. अशी माहिती ॲड. कांबळे यांनी यावेळी दिली. प्रा. मुकेश पवार यांनीही यावेळी या क्रांतीकारी शहिदांच्या लढ्यांची माहिती दिली. स्वागत अमरसिंग आदियाल, आभार तानाजी जवळकर यांनी मानले.
