घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनातील घरांचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु : विशाल वाकडकर

Share this News:

पिंपरी (दि. 20 जुलै 2018) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात शहरात विकसित केलेल्या घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील लाभार्थ्यांना ताबडतोब घरांचे वाटप करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र आंदोलन करील असा इशारा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

या प्रसिध्दीपत्रकात वाकडकरांनी पुढे म्हटले आहे की, मागील पंधरा वर्षात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारकडून सर्वसामान्य नागरीकांसाठी आवश्यक अशा घरकुल व झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांसाठी हजारो कोटींचा निधी आणण्यात आला. यातूनच घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनाचे बहुतांशीकाम राष्ट्रवादीच्या काळात पुर्ण झाले. भाजपाच्या पदाधिका-यांनी चुकीचा आक्षेप घेऊन निगडी ओट्टास्किम, नेहरूनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरकुल प्रकल्पात अडवणूक केली आहे. भाजपाच्या या चुकीच्या धोरणांमुळे गोरगरीबांना हक्काच्या घरांपासून वंचित रहावे लागत आहे. केंद्रात व राज्यात भाजपाप्रणित सरकार येण्याच्या अगोदर भाजपाने 2022 पर्यंत देशातील सर्व नागरीकांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मागील सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने ‘प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भुखंड विकसित करण्याचे ‘आश्वासन दिले होते. आता पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष कालावधी झाला. अद्यापपर्यंत भाजपाने असा एकही भुखंड विकसित केला नाही. उलट राष्ट्रवादीच्या काळात उभारण्यात आलेल्या घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील घरांचे वाटप करण्यात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना वेळ नसल्याची सबब सांगून गरजू लाभधारकांना वेठीस धरले जात आहे. हॅरीस पूलाला समांतर उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्‌घाटन करण्याबाबत राष्ट्रवादीने दबाव आणल्यानंतर भाजपाच्या पदाधिका-यांना जाग आली. अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या काळात उभारण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांची उद्‌घाटने मुख्यमंत्र्यांच्या वेळे अभावी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री व पाकलमंत्र्यांना श्रमिकांच्या या नगरीशी काही देणे घेणे नाही. कधीतरी शहरात येऊन एकाच ठिकाणी बसून राष्ट्रवादीने विकसित केलेल्या प्रकल्पांची ऑनलाईन उद्‌घाटने करण्याची नवीन पध्दत ते आणत आहेत. झोपडपट्टी मुक्त शहर हि संकल्पना राष्ट्रवादी कॉंग्रेसची अगोदर पासून आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहरात घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविले. या प्रकल्पांतील उर्वरीत लाभार्थ्यांना ताबडतोब घरांचे वाटप करावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वंचित राहिलेल्या पात्रताधारकांना घरांचे वाटप करेल असाही इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली आहे.