जेबीजीव्हीएसच्या सहाय्याने मिळणार आंबोलीला शुध्द पाणी
खेड तालुक्यातील दुर्गम गावात बसवलेल्या संयंत्राचा होणार २,५०० ग्रामस्थांना फायदा
पुणे: ११ एप्रिल: दुषित पाण्याने होणारे आजार ही अनेक गावांत मोठी समस्या आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील दुर्गम अशा आंबोली गावात जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेने (जेबीजीव्हीएस) अलीकडेच बजाज ऑटो सामाजिक बांधिलकी अंतर्गत युव्ही व आरओ प्रकारचे जलशुद्धीकरण संयंत्र बसवले असून त्याचा गावातील २,५०० लोकांना उपयोग होणार आहे.
प्रतिदिन २० हजार लिटर शुद्धीकरण क्षमता असलेल्या या संयंत्रातून ग्रामस्थ रु पाच प्रती २० लिटर या दराने शुध्द पाणी घेऊ शकतील. पुण्याच्या तोयं या कंपनीने हे संयंत्र बसवले आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी झालेल्या एका छोटेखानी समारंभात गावचे सरपंच श्री संजय कोकणे, माजी पंचायत समिती सभापती श्री सुरेश शिंदे, तोयंचे प्रतिनिधी आणि श्री व्ही बी सोहोनी (सचिव), श्री सतीश धामणे (लेखा व्यवस्थापक), श्री आर एम हिंगे (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी) व श्री अतुल साठे (जनसंपर्क अधिकारी) या जेबीजीव्हीएस प्रतिनिधींच्या उपस्थितीत संयंत्राचे उद्घाटन झाले. या वेळी बोलताना श्री सोहोनी म्हणाले, “या संयंत्रामुळे ग्रामस्थांच्या शुद्ध पाण्याची समस्या सुटली असून योग्य प्रकारे जलव्यवस्थापन व पर्यावरण रक्षण करून पाण्याचे स्त्रोत सुरीक्षित राहतील ही आता गावातील सर्वांची जवाबदारी आहे. संयंत्र तेव्हाच पाणी शुद्ध करू शकेल जेव्हा त्यात पाणी उपलब्ध असेल.”
श्री सोहोनी यांनी फीत कापून व पूजा करून संयंत्राचे उद्घाटन केल्यावर गावातील विठ्ठल मंदिराच्या आवारात मान्यवरांचे सत्कार झाले व महिलांना प्रीपेड कार्ड वितरीत करण्यात आली. या कार्ड मध्ये आवश्यक रक्कम भरून रोज गरज असेल त्या प्रमाणे पाणी घेता येईल. जल संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
जेबीजीव्हीएस खेड तालुक्याच्या २२ गावांत कार्यरत असून महिला सबलीकरण, शाळा सुधार, आरोग्य व आर्थिक विकास या क्षेत्रांत विविध कामे केली जातात.
