देशभरातील गुंतवणूकदारांचा सेबी विरोधात पहिलाच देशव्यापी महामोर्चा
पुणे, दि. 12 फेब्रुवारी : देशभरातील कोट्यावधी ठेवीदारांचे पैसे बुडविणा-या पर्ल्स (पीएसीएल) कंपनीविरोधात गेली अनेक वर्ष लढा देणा-या जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने सेबी (सेक्युरिटीज् अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 फेब्रुवारी (सोमवार) रोजी एक लाखांहून अधिक गुंतवणूकदार देशभरातून येणार असल्याची माहिती, जनलोक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने अध्यक्षा सुनंदा कदम यांनी दिली.
पीएसीएल कंपनीच्या ऑस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून जवळपास 79 मिलीयन डॉलर्स (400 कोटी रुपये) तेथील कोर्टच्या एस्क्रो अकौंटमध्ये जनलोक गुंतवणूकदार यांच्या दाव्यानुसार रोख रक्कम जमा आहे. परंतू सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास दिरंगाई होत आहे. तसेच सेबीने पीएसीएल कंपनीच्या 6 कोटी गुंतवणूकदारांची व्याजासह रकमेच्या परताव्याची जबाबदारी स्विकारली नाही. त्यामुळे या गुंतवणूकदारांचा उद्रेक होऊन सेबीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातून सेबीच्या मनमानी कारभारामुळे “PACL प्रकरणातून सेबी हटाव” आंदोलन करण्यात येणार आहे.
केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील गोरगरीब जनतेने पी.ए.सी.एल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविले होते. परंतू चार वर्षापुर्वी या कंपनीवर सी.बी.आय चौकशी व सेबी इन्वेस्टीगेशन चालू असल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकरणावर 90 दिवसामध्ये पी.ए.सी.एल कंपनीच्या मालमत्तांची विक्री करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे अशी ऑर्डर मुंबई येथील सॅट कोर्ट ने दिली होती. याविरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यावेळी माननीय सुप्रिम कोर्टाने न्यायमुर्ती आर.एम.लोढा यांची कमिटी स्थापन करुन पीएसीएल कंपनीच्या मालमत्तेची विक्रि करुन 6 महिन्यांच्या आत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सुप्रिम कोर्टाच्या आदेशाला आज दोन वर्ष पुर्ण होत आहेत तरीदेखील कमिटीकडे केवळ 370 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करत आहे.
पीएसीएल गुंतवणूकदारांच्या ठेवीतील 57 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे हे प्रकरण देशभर गाजले. देशभरातील अंदाजे 5.85 कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. शेकडो गुंतवणूकदारांनी आत्महत्या केल्या तर हजारो तरुणांचे रोजगार गेले आहेत.
जनलोक प्रतिष्ठान संघटनेचे सचिव गणेश खांदवे, सहसचिव काशिनाथ चव्हाण, खजिनदार आबासाहेब रुपनर हे यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
