पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तत्पर राहा
पुणे, दि. 16 मे 2017 : पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये किंवा खंडित झाल्यास कमीतकमी कालावधीत सुरळीत करण्यासाठी अभियंते व कर्मचार्यांनी तत्पर राहावे, असे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी सोमवारी (दि. 15) दिले.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीमध्ये टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा दाखविल्यास तसेच उपलब्ध पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनावश्यक विलंब झाल्याचे दिसून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा तसेच पावसाळ्यातील उपाययोजनांबाबत गणेशखिंड येथील प्रकाशभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे उपस्थित होते. प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले, पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे येत्या पंधरवड्यात पूर्ण झाली पाहिजेत. मागील पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे यंदा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व विभाग कार्यालयस्तरावर 24 तास कार्यरत राहणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष सुरु करावेत. तसेच भूमिगत वाहिन्यांमधील बिघाड शोधण्यासाठी व दुरुस्तीसाठी केबल टेस्टींग व्हॅन व केबल जॉईंटर व्हॅन सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खोदकामामुळे अनेक ठिकाणी वाहिन्या तुटण्याचे प्रकार दिसून येत आहेत. अशावेळी संबंधीत पालिका यंत्रणेशी समन्वय साधून हे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. याशिवाय वीजग्राहकांशी संवाद ठेवावा. योग्य माहिती देऊन त्यांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण करावे. मोबाईल स्वीच ऑफ होणार नाही याची काळजी घ्यावी. महावितरणचे जे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. राजेंद्ग पवार, श्री. रमेश मलामे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांची उपस्थिती होती.