भोसरीत राष्ट्रवादी युवक मेळावा संपन्न

IMG-20180722-WA0009.jpg
Share this News:

पिंपरी (दि. 22 जुलै 2018) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने पक्ष संघटना मजबूत करीत बुथ कमिटी सक्षम करावी व लोकनेते शरद पवार यांचे विचार घराघरात पोहचवावेत. पुढील वर्षी राज्यात राष्ट्रवादीचे वादळ येणार आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन होऊन अजितदादा पवार मुख्यमंत्री होतील. असा आशावाद विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘युवक बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा’ भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रविवारी (दि. 22 जुलै) आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार रणजित मोहिते पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवा नेते रोहित पवार, जिल्हा अध्यक्ष सचिन घोटखुले, माजी आमदार विलास लांडे, बापू पठारे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, पुणे महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, शाम लांडे, विक्रांत लांडे, प्रवक्ते फजल शेख, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय मुंडे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दर दहा पंधरा वर्षांनी सत्ता परिवर्तनाची लाट येते, या लाटेत मागील निवडणूकीत ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून न येणाराही खासदार, आमदार झाला. पुढील वर्षी राज्यात राष्ट्रवादीचे वादळ येणार आहे. त्यामुळे अजितदादांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. यासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी पुढाकार घेऊन नियोजबद्द काम केले पाहिजे. सत्ता परिवर्तनाची ही चांगली संधी आहे. राज्याचे ‘फसणवीस’ मुख्यमंत्री फसवे आणि फेकू आहेत. वारंवार होणा-या गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा हाहाकार झाला आहे. बळीराजाला दुध दरवाढीसाठी रस्त्यावर दुध ओतून देण्याची वेळ आली आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. वाढलेल्या बेरोजगारीमुळे कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. भाजपच्या लाटेत बेधुंद झालेले तरुण आता बेरोजगारीमुळे शुध्दीवर आले आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखविणे राष्ट्रवादी युवकांचे काम आहे. निवडणूकीच्या तोंडावर चार वर्षांपुर्वी भाजपने दिलेले एकही आश्वासन पुर्ण करता न आल्यामुळे भाजप विरोधी लाट आता सुरु झाली आहे. मतदार राजा सक्षम पर्याय शोधत आहे त्यांना राज्यात राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही. भाजप राज्यात सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणातून ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मतदार ‘फसणवीसांच्या’ खोट्या आश्वासनांना कंटाळली आहे. अजितदादांनी ज्यांना भरभरुन दिले त्यांनीच निवडणूकीच्या काळात पक्षाशी गद्दारी केली. राष्ट्रवादीच्या येणा-या वादळामुळे ते पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत त्यांना वाटा बंद झाल्या असून त्यांचा राजकारणातला ‘द एण्ड’ जवळ आला आहे असा सुचक ईशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.

माजी खासदार रणजित मोहिते पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी आमदार विलास लांडे यांनी देखील मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटखुले, पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आभार मानले.