वाघोली परिसरातील वीजविषयक प्रश्नांवर लवकरच तोडगा
पुणे, दि. 22 : वाघोली व परिसरातील वीजविषयक प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजयंत्रणेच्या आवश्यक दुरुस्तीसह नवीन वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच नादुरुस्त मीटर बदलून ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यात येणार असल्याची माहिती मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांनी दिली.
वाघोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच वसुंधराताई उबाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. रामभाऊ दाभाडे, श्री. संदीप सातव, उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग भुजबळ, सहाय्यक अभियंता श्री. नंदकुमार वैरागर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वाघोली परिसरातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती कामे करण्यासोबतच आवश्यक ठिकाणी वीजयंत्रणेतील जुने भाग सुद्धा बदलण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 28 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कामांना प्रत्यक्षात सुरवात झालेली आहे. याशिवाय कवडेवस्ती येथील रोहित्र स्थानांतरीत करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आलेᅠआहे तेथे एरियल बंच केबल टाकण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सुमारे 44 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी लोणीकंद उपकेंद्गातून 22 केव्ही क्षमतेच्या वाघेश्वर भूमिगत वाहिनीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. या नवीन वाहिनीमुळे सद्यस्थितीत वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवरील वीजभार कमी होणार आहे. याशिवाय नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. वीजग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली.
