‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आरोग्य आणि पर्यावरणासाठी गरजेचा – महेश लांडगे
पिंपरी मोशीतील कचरा डेपोला लागलेली आग दुर्दैवी आहे. सहा वर्षाच्या कालखंडानंतर डेपोला आग लागली आहे. शहरातील कच-याची समस्या उग्र होत आहे. नियोजित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामुळे कच-याची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. तसेच मोशीतील कचरा डेपोला आग लागू नये यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. तात्पुरत्या आणि कायमस्वरुपाचा तोडागा काढावा, अशा कडक सूचना देखील त्यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला आग लागली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, सह शहर अभियंता अयुब्बखान पठाण, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
”शहरातील कच-याची समस्या दिवसें-दिवस उग्र होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून पुढल्या महिन्यात त्याचे काम सुरु होईल असे सांगत आमदार लांडगे म्हणाले, ”पिंपरी चिंचवड शहरातून दिवसाला ८०० ते ८५० टन कचरा निर्माण होतो. ‘वेस्ट टू इनर्जी प्रकल्प’ झाल्यावर दैनंदिन कच-यावर प्रक्रिया करण्यात येईल. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरु झाल्यावर ६०० टन कचरा त्यामध्ये जाणार आहे. सुका आणि मिक्स कच-याचा वापर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. तसेच डेपोवरील कच-यावर देखील प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे डेपोचा थर देखील कमी होईल”.
”हा प्रकल्प झाल्यास शहरातील कच-याची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ माझा एकट्याचा नाही. संपुर्ण शहराचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे व्यापक दृष्टीने पहावे, त्याचे कोणी राजकारण करु नये”, अशी विनंती देखील आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना केली. मी आमदार होण्यापूर्वी अनेक लोकप्रतिनीधी होऊन गेले. त्यांनी विकासकामे केली नाहीत म्हणून मी करायची नाहीत का? असा संतप्त सवाल उपस्थित करत आमदार लांडगे म्हणाले, मी शहरातील गोरगरिब नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. कच-याच्या समस्येतून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. कोण काय आरोप करतो, यामध्ये मला पडायचे नाही. मी कोणावर देखील आरोप केले नाहीत. केवळ ज्यांनी आरोप केले. त्यांना प्रतित्युर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले”.
”मोशीतील कचरा डेपोला वाढलेल्या तापमानामुळे आग लागली होती. आगामी काळात आग लागू नये, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच मोशी, कुदळवाडी परिसरात वांरवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी मोशी परिसरात नवीन अग्निशामक केंद्र सुरु करावे. फायरच्या गाड्या दुरुस्ती करुन घेण्यात याव्यात. अग्निशामक जवानांची दर तीन महिन्यातून ‘फिटनेस’ तपासणी करुन घ्यावी. शहरात अग्निशामक केंद्रासाठी जेवढी आरक्षणे आहेत, तेवढी आरक्षणे विकसित करा” अशा सूचना देखील आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”मोशीतील कचरा डेपोला भविष्यात आग लागू नये यासाठी कायमस्वरुपी उपाय केले जातील. तापमानामुळे आग लागली होती. आग लागू नये यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. आग लागू नये यासाठी कचरा डेपोवर मातीचे ‘लेअर’ करत आहोत. कच-यामध्ये मातीचे थर टाकण्याचे काम सुरु आहे. डेपोवर टाण्यासाठी ३०० ट्रक माती आणली आहे. घनकचरा विघटन, विल्हेवाट या २०१६ च्या अधिनियमानुसार कच-याची शास्त्रोयक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे.
‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कामाची निविदा पुर्णपणे पारदर्शपणे काढली आहे. निविदेसाठी दोनवेळा मुदतवाढ दिली होती. सगळ्यांशी विचारविनिमय करुन आणि तांत्रिक समितीकडून मूल्यमापन करुन घेतले आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे”.