हनुमान जयंती च्या शुभमुहूर्तावर  “मंकीबात” या बाल चित्रपटाच्या प्रमोशन ला सुरुवात

Share this News:

-१८ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी येतोय धम्माल बालचित्रपट

ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील बन्सीधर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला अचानक एक माकड आले,आणि चक्क त्या माकडाने, हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला.हा चमत्कार बघायला आजूबाजूचे लोक आणि लहान मुलांनी मंदिरात गर्दी केली .हे माकड गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर माणसांमध्ये सामील झाले, लहान मुले त्याला नमस्कार करू लागली …..

अचानक ते माकड माणसासारखे उभे राहिले आणि चक्क माणसासारखे बोलूही लागले , मग सगळ्यांनी त्याच्या जवळ जाऊन पहिले आणि काय आश्चर्य ? माकडाच्या वेशात आतमध्ये एक कलाकार मुलगा होता .

निमित्त होते लेखक-दिग्दर्शक विजू माने यांच्या आगामी “मंकी-बात” या आगळ्या वेगळ्या बालचित्रपटाच्या प्रमोशनचे.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर विजू माने व बॉलीवूड चे प्रसिद्ध रंगभूषाकार विद्याधर भट्टे आणि त्यांनी साकारलेले हुबेहूब माकड यांनी ठाण्यातील बन्सीधर मंदिरात श्री हनुमानाचे दर्शन घेऊन “मंकी-बात” या बाल चित्रपटाचा हटके पद्धतीने प्रसिद्धीचा श्रीगणेशा केला.

परिणीता ,रबने बना दि जोडी ,लगे रहो मुन्ना भाई , इंग्लिश विन्ग्लीश ,शामिताभ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी “मंकीबात” या बालचित्रपटासाठी हे विशेष माकड तयार केले आहे.

या प्रसंगी भट्टे म्हणाले माकडाचा हा स्पेशल गेट अप करण्यासाठी मला १५ दिवस लागले ,या मास्क साठी सिलिकॉन वापरले आहे ,त्यामुळे ते हुबेहूब माकडाच्या त्वचेसारखे दिसत आहे ,या मास्कमधून आतील कलाकाराला व्यवस्थित श्वास घेता येतो. त्यामुळे शूटिंग करतांना कलाकाराला काही त्रास झाला नाही.

लेखक-दिग्दर्शक विजू माने म्हणाले मी प्रथमच एक बालचित्रपट तयार केला आहे या सुट्टीत आपल्या मुलांनी आपल्या मातीतला अस्सल, मनोरंजनपर धम्माल आणि मस्ती असलेला पण आपली मराठी संस्कृती ,संस्कार जपणारा असा “मंकी–बात” हा बालचित्रपट पहावा ,या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना धमाल करण्यासाठी आम्ही हा चित्रपट १८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहोत.