.. अखेर रवि लांडगे बिनविरोध!
.. अखेर रवि लांडगे बिनविरोध!
– आमदार लांडगे यांची यशस्वी शिष्टाई
– योगेश लांडगे यांनी अर्ज मागे घेतला
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाला रुजविणारे कै. अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वारसदार रवि लांडगे यांना बिनविरोध निवडणून आणत आमदार महेश लांडगे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पहिला झटका दिला आहे.
भोसरीतील प्रभाग क्रमांक ६- धावडे वस्तीमधील ‘क’ जागेवर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे रवी लांडगे हे पुतणे आहेत.
याबाबतची माहिती देण्यासाठी शहर भाजपच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक सहामधील क आणि ड जागेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे कोणालाच उमेदवार मिळाले नाहीत. मात्र, दोन अपक्षांचा उमेदवारी अर्ज राहिले होते.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. अपक्ष अर्ज दाखल केले उमेदवार योगेश लांडगे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार रवि लांडगे यांचे मनोमिलन करण्यात आले. गावकी-भावकीचे राजकारण उफाळून येवू नये. यासाठी दोघांची समजूत कढण्यात यश मिळाले. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या जागेवर रवि लांडगे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. रवी लांडगे यांचे दिवंगत वडील बाबासाहेब लांडगे भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची विरोधी पक्षनेते होते.
——————
आमदार लांडगे यांनी खाते खोलले…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षातच खरी लढत होणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत प्रभागातील महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार महेश लांडगे यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडणुकीत पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आणून आमदार लांडगे यांनी खाते खोलले आहे. पर्यायाने या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून, या आघाडीचे शिल्पकार आमदार लांडगे ठरले आहेत. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळावी, हे कै. अंकुशराव लांडगे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरविण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
