आमदार जगताप “शिवशक्ती संगम” कार्यक्रमात संघाच्या गणवेशात सहभागी
संघाचा गणवेश परिधान करणारे पिंपरी-चिंचवडमधील पहिले आमदार
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हिंजवडीजवळील मारूंजी-नेरे-जांबे या तीन गावांच्या सीमेवर आयोजित केलेल्या “शिवशक्ती संगम” कार्यक्रमासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे खाकी चड्डी आणि पांढरा सदरा घालून सहभागी झाले. संघाचा गणवेश परिधान करणारे पिंपरी-चिंचवडमधील ते पहिले आमदार ठरले आहेत. त्यामुळे आमदार जगताप अवघ्या एक-दीड वर्षातच भाजपमध्ये रमले असून, उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंड असलेले आमदार लक्ष्मण जगताप २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीची मदत मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे आमदार जगताप यांनी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविणे पसंत केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवत पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच कमळ फुलविले.
परंतु, ते भाजपमध्ये जास्त काळ रमतील का? याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, राष्ट्रवादीसोबत असतानाही त्यांनी आपला हिंदुत्ववादी चेहरा कधी लपविण्याचा प्रयत्न केला नाही. आमदार जगताप यांनी योगगुरू रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर यांच्यासारख्या धर्मगुरूंचे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांना आमदार जगताप हे नेहमीच आपलेसे वाटत आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांनी नाके मुरडली होती.
भाजपचे आमदार झाल्यानंतर त्यांनी पिंपरी येथील डाल्को कंपनीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला विरोध करून त्यांनी आपला हिंदुत्ववादी चेहरा जपला आहे. शहरात कत्तलखानाच नको, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या कत्तलखान्याला थेट मुख्यमंत्र्यांच्याकडून स्थगिती आणली. त्याचे शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केले. आता आमदार जगताप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश परिधान केल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
संघाच्या वतीने हिंजवडीजवळील मारूंजी-नेरे-जांबे या तीन गावांच्या सीमेवर आयोजित केलेल्या “शिवशक्ती संगम” कार्यक्रमाला आमदार जगताप हे खाकी चड्डी आणि पांढरा सदरा घालून उपस्थित होते. त्यामुळे संघाचा गणवेश परिधान करणारे पिंपरी-चिंचवडमधील ते पहिले आमदार ठरले. ते भाजपमध्ये गेल्यानंतर तेथे रमणार का?, असा सवाल उपस्थित केला जात होता. परंतु, संघाच्या कार्यक्रमाला संघाच्याच गणवेशात उपस्थित राहून त्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार जगताप अवघ्या एक-दीड वर्षातच भाजपमध्ये रमले असल्याचे स्पष्ट झाल्याने उलटसुलट चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
