उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे 20 एप्रिलला पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीला

Share this News:

पुणे, दि. 11 : राज्याचे उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यात नागरिकांच्या तक्रारी, सूचना, निवेदन स्वीकारणे व त्याचे निराकरण करण्यासाठी विशेष वेळ राखीव ठेवला आहे.

गुरुवारी (दि. 20) रास्तापेठ येथील महावितरणच्या पुणे परिमंडल कार्यालयाच्या आवारात दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात उर्जामंत्री ना. बावनकुळे हे नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून तक्रारी, सूचना व निवेदन स्वीकारतील व त्याचे निराकरण करणार आहेत. यावेळी महावितरण, महापारेषण तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते दि. 20 एप्रिलला महावितरण अंतर्गत पायाभूत आराखडा-2 मधील उपकेंद्रांचे उद्‌घाटन, एकात्मिक उर्जा विकास योजना व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील उपकेंद्रांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच लोकप्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत पुणे जिल्ह्यातील वीजविषयक कामांबाबत ते चर्चा करणार आहेत.

महावितरणशी संबंधीत तक्रारी, सूचना किंवा निवेदनाची एक प्रत दि. 18 एप्रिलपर्यंत रास्तापेठ येथील महावितरण ग्राहक सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहे. तसेच [email protected] या इमेलवर प्रत पाठविता येणार आहे. याशिवाय दि. 20 ला आयोजित कार्यक्रमातही मा. मंत्री महोदयांना तक्रारी, सूचना किंवा निवेदन देता येईल. उर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती असलेल्या या उपक्रमाचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.