कुपोषित बालमृत्यू रोखण्यासाठी ठोस पावले उचला खासदार सुप्रिया सुळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक आवाहन

Share this News:

नवी दिल्ली, दि. २५ (प्रतिनिधी) – ‘कुपोषण आणि अचूक वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे बिहारमध्ये शेकडो कुपोषित बालकांच्या शरीरातील रक्तशर्करा कमी होऊन (हायपोग्लायकेमीक एन्सेफॅलोपॅथी) ती मुले मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे केंद्रसरकारने कुपोषित बालमृत्यू रोखण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करून ठोस पावले उचलावीत,’ असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केले आहे.

“गेल्या काही आठवड्यांपासून बिहारमध्ये २००हून जास्त निष्पाप बालकांना हायपोग्लायकेमीक एन्सेफॅलोपॅथी म्हणजेच कुपोषणामुळे रक्तशर्करा कमी होऊन मेंदूज्वराने जीव गमवावे लागले आहेत. एप्रिल व मे महिन्यात बिहारमध्ये लिची फळांची काढणी आणि साठवणूक केली जाते. त्यात रोगग्रस्त लिची फळे खाल्ल्याने हे बालमृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु हा अंदाज तथ्यावर आधारीत नसून चुकीचा आहे, असा दावा सुळे यांनी केला आहे.

या आजारांची लक्षणे आणि उपचारासंदर्भात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण कुपोषण असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रसरकारने कुपोषण व भूकबळी रोखण्यासाठी बिहार राज्याला विशेष निधी द्यावा. वैद्यकीय उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची पथके आणि पुरेसी औषधे देण्यात यावी. भविष्यात कुपोषणामुळे बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. पोटचे मूल गमावणे याचे दुःख जन्म दिलेल्या मातेला आणि त्याचा जीव वाचवू न शकलेल्या पित्यालाच समजते. त्यामुळे बिहारमध्ये आणीबाणी असल्याचे गृहित धरून तातडीने ठोस पावले उचलावीत,’’ असे भावनिक आवाहन सुळे यांनी मोदी यांना लिहिल्येल्या पत्रात पत्रात केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही त्यांनी असेच आवाहन करणारे पत्र पाठवले आहे.