धावपटू मिल्खा सिंग यांच्या हस्ते ‘पेस १८’ विजेत्यांचा सत्कार
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ( एआयटी )च्या ‘पेस २०१८’ या १५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची अत्यंत यशस्वी सांगता झाली. एआयटीच्या पुणे प्रांगणात भरलेल्या या महोत्सवात एआयटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे क्रीडानैपुण्य दाखवून देत सर्व क्रीडाप्रकारात आपली छाप उमटवली.
विख्यात धावपटू श्री. मिल्खा सिंग हे या महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशीचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते पेस १८ च्या आंतर-महाविद्यालयीन विजेत्यांचा सत्कार झाला.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पेस चा हा १६वा क्रीडामहोत्सव दरवर्षी प्रमाणेच गाजला. ४ दिवस चाललेल्या या महोत्सवात ५० महाविद्यालये आणि ३००० उत्साही प्रेक्षकांनी हजेरी लावली.
या महोत्सवाचे यजमानपद भूषवणारी एआयटी ही संस्था १६ विविध क्रीडाप्रकारात विजेती ठरली. पेस २०१८ चे प्रमुख आकर्षण होते महिलांच्या क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा. स्क्वाश, फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलसहित इतरही सर्व खेळांना खेळाडूंचा प्रचंड सहभाग लाभला.
नॅशनल डिफेन्स अकादमी, कॅडेट ट्रेनिंग विंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, आर्म्ड फोर्सेस, विज्ञान महाविद्यालये, केआयएमएस, कमिन्स, डी.वाय.पाटील इत्यादी मान्यवर शैक्षणिक संस्थांचा लक्षणीय सहभाग या महोत्सवाला लाभला. ‘पेस’ने या महोत्सवाद्वारे अविस्मरणीय क्षणांचा खजिनाच निर्माण केला, जो आगामी वर्षांत सर्वांच्या मनाला स्फूर्ती देत राहील यात शंका नाही.
श्री. मिल्खा सिंग यांच्या देदीप्यमान कारकीर्दीवर आधारित एक खास सिनेमा एआयटीच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. तेव्हा गतकाळाच्या स्मृतींनी या थोर खेळाडूच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल जलज भोला यांच्या हस्ते श्री. मिल्खा सिंग यांचा सत्कार करण्यात आला. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राहुल सिंग याने काढलेले मिल्खा सिंग यांचे पोर्ट्रेट त्यांना या प्रसंगी भेट म्हणून देण्यात आले. निवृत्त ब्रिगेडियर अभय भट यांनी समारोपाचे भाषण केले व सर्व संबंधितांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी बोलताना पद्मश्री श्री. मिल्खा सिंग विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना म्हणाले “भरपूर मेहनत आणि चिकाटी ठेवलीत तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही, मात्र उद्दिष्ट गाठायचे असेल तर याला पर्याय नाही” त्यांनी पालकांनाही आपल्या मुलांवर अथक परिश्रम घेण्याची सूचना केली. ते पुढे म्हणाले “ माझी शेवटची इच्छा आहे ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल, जे मी रोम ऑलिम्पिक मध्ये जिंकू शकलो नाही. तुमच्यापैकी कुणीतरी ते जिंकून आणावे अशी माझी इच्छा आहे”
