महापारेषणच्या 132 केव्ही वीजवाहिनीच्या कामामुळे आज शिवाजीनगर व परिसरात वीजपुरवठा बंद
पुणे, दि. 27 मार्च 2019 : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने गणेशखिंड येथील महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 28) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शिवाजीनगर, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, बोपोडी, नारायण पेठ, शनिवार पेठ, पाषाण आदी भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
महापारेषणच्या चिंचवड व रहाटणी या उपकेंद्रातून 132 केव्ही डबल सर्कीट वीजवाहिनीद्वारे गणेशखिंड 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. रहाटणी येथील जगताप डेअरीजवळील साई चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. मात्र त्यासाठी बाजूलाच असलेल्या व गणेशखिंड उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या डबल सर्कीट 132 केव्ही वीजवाहिनीची उंची वाढविणे आवश्यक आहे. या वीजवाहिनीची उंची वाढविण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे व त्यासाठी महापारेषणकडून देखरख सुरु आहे.
या कामासाठी गणेशखिंड उपकेंद्गाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी महावितरणचे 11 केव्हीच्या 15 व 22 केव्हीच्या 10 अशा एकूण 25 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे फर्ग्युसन रस्ता, न.ता. वाडी, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स, ईस्क्वेअर, यशोदानगर, अशोकनगर, महालेनगर, वडारवाडी, घोले रोड, मॉर्डन हायस्कूल, पोलीस लाईन, आनंद हौसिंग सोसायटी, सिंम्बायसिस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, हर्डिकर हॉस्पीटल, संचेती, आकाशवाणी, सिमला ऑफीस, नारायण पेठ, शनिवार पेठ, राजभवन, वाकडेवाडी, खैरेवाडी, अॅग्रीकल्चर कॉलेज, चाफेकर नगर, भोसलेनगर, आयसीएफ कॉलनी, सिंचननगर, मंत्री किशोर पार्क, आपटे रोडचा काही भाग, जंगली रोडचा काही भाग, जिल्हा कोर्ट, तोफखाना, कामगार पुतळा, शिवाजीनगर गावठाण, विश्रामबाग, पत्रकार नगर, गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत, डिफेन्स कॉलनी, कर्वेरोड, एरंडवणा, प्रभात रोड, डेक्कन परिसर, औंध गाव, संघवीनगर इत्यादी भागामध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून काही भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. मात्र उन्हामुळे विजेची मागणी वाढलेली असल्याने भारव्यवस्थापन शक्य होणार नाही, अशी स्थिती आहे. दुपारी 4 वाजता पूर्वनियोजित काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महापारेषण कंपनीकडून देण्यात आली. उड्डाण पुलाच्या कामासाठी 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची उंची वाढविणे आवश्यक असल्याने गुरुवारी वीजपुरवठा बंद असलेल्या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषण कंपनीकडून संयुक्तपणे करण्यात आले आहे.
