माजी पोलीस आयुक्त आणि पंजाब पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांच्या बुलेट फॉर बुलेट या आत्मचरित्राचे प्रकाशन
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते भारताचे सुपरकॉप जे. एफ. रिबेरो यांच्या बुलेट फॉर बुलेट या इंग्रजी आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुंबई येथील आझाद मैदान पोलीस स्टेशन जवळील प्रेरणा हॉल येथे दिमाखात पार पडले. हे पुस्तक चिनार पब्लिशर्स आणि सरहद रिसर्च सेंटर फॉर कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन अँड पीस यांनी प्रकाशित केले आहे.
जे. एफ. रिबेरो, त्यांच्या पत्नी व मुली, तसेच महाराष्ट्र व मुंबई पोलिसांचे अनेक आजी-माजी आयुक्त, व आयपीएस अधिकारी या समारंभाला आवर्जून हजर होते. प्रसिद्ध लेखक किरण नगरकर यांच्यासह अनेक मान्यवरदेखील हजर होते. ‘पोलीस किंवा कुठलेही सरकारी अधिकारी यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, ते जनतेचे सेवक आहेत, मालक नव्हे,’ असे सांगून रिबेरो यांनी तरुण पोलीस अधिका-यांना जीवनमूल्यांचे जतन करण्याची व त्यानुसार वागण्याचे आवाहन केले. विविध परिस्थितींमध्ये कसे वागता येते, याबद्दल नव्या पिढीतल्या पोलीस अधिका-यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा या पुस्तकातून मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘रिबेरो हे आधुनिक महर्षी आहेत,’ अशा शब्दांत रिबेरोंचा सन्मान करून पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षितांनी सांगितले की, ‘मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे. या पुस्तकाद्वारे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या.’
या प्रसंगी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, संचालक प्रशांत तळणीकर आणि समन्वयक संजीव शहा उपस्थित होते.
