मुख्य अभियंता शंकर शिंदे यांची कार्यकारी संचालकपदी निवड

Share this News:

कोल्हापूर, दि. 25 –  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित असलेले महावितरणचे मुख्य अभियंता श्री. शंकर शिंदे यांची महावितरणच्या कार्यकारी संचालक (वितरण) पदी सरळसेवेतून निवड झाली आहे.

कोल्हापूर परिमंडलाच्या 21 महिन्यांच्या कारकिर्दीत मुख्य अभियंता म्हणून शंकर शिंदे यांनी ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर आपला कटाक्ष ठेवला. वीजग्राहकाला जास्तीत जास्त सुविधा मिळतील, कामात गतिमानता येईल, वीजबिलांची पूर्ण क्षमतेने वसूली होण्यासाठी प्रयत्न केले. विविध योजना कल्पकतेने राबविल्या.

2015-16 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 41 हजार 702 तर सांगली जिल्ह्यामध्ये 35 हजार 665  हजार अशा एकूण 77 हजार 367 नवीन वीज जोडण्या देण्याचे भरीव काम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे झाले. यात 15 हजार 25 जोडण्या कृषीपंपाच्या आहेत. चालू 2016-17 या आर्थिक वर्षात ऑक्टोबर अखेर 49 हजार 744 नविन जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात देखील कृषीपंपाच्या 10 हजार 68 जोडण्या आहेत. विशेष म्हणजे कोणतीही ठोस योजना नसताना हे काम शिंदे यांनी केले आहे.

श्री. शिंदे यांच्या काळात इन्फ्रा-२ योजनेत ४८ वीज उपकेंद्रे मंजूर होती. त्यापैकी १८ उपकेंद्राचे काम पूर्ण केले. ४८ पैकी ३६ उपकेंद्रासाठीच्या जागा ताब्यात आल्या. त्या सर्व उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना (DDUGJY)  आणि दुसरी एकात्मिक विद्युत विकास योजना (IPDS) योजनेसाठी शिंदे यांचे प्रयत्नांमुळे कोल्हापूरला ६५ कोटी तर सांगली जिल्ह्यासाठी ३२ कोटी निधी मंजूर झालाआहे.

परिमंडलाचा निरोप घेताना शंकर शिंदे म्हणाले, ‘कोल्हापूर ही देवभूमी असून येथील जनमाणसांत प्रचंड सहनशिलता आहे. वीजग्राहकही अत्यंत संवेदनशील व सौजन्यशील आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही सुचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे ग्राहकाभिमुख सेवा देणे शक्य झाले. पुढील काळ महावितरणसाठी आव्हानात्मक आहे. कंपनीची प्रगती साधण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कंपनीच्या प्रगतीवरच  आपला उत्कर्ष अवलंबून आहे.’

गुरुवारी सायंकाळी झालेल्या निरोप समारंभात अधीक्षक अभियंते जितेंद्र सोनवणे व राजाराम बुरुड, सांगलीचे प्रभारी अधीक्षक अभियंता अनिल थोरात, सहा. महाव्यवस्थापक (मासं) सुशील पावसकर, सहा. महाव्यवस्थापक (विवले) राजेंद्र रानगे यांचेसह सर्व संघटना प्रतिनिधी, अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन हनमंत नलवडे यांनी तर प्रास्ताविक राजेंद्र हजारे यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी आभार मानले.