विठ्ठलनामात रंगला ‘रंग पांडुरंग’ हा अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम

H2A6969.jpg
Share this News:

पुणे, दि. १८ –आषाढी वारीमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, याच भक्तीमय वातावरणात दिग्गज गायकांनी विठूनामाचा गजर करत ‘रंग पांडुरंग’ या अभंग, भाक्तीगीताच्या कार्यक्रमात रसिकांना मंत्रमुग्ध केले, निमित्त होते संगीतकार प्रसाद जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘रंग पांडूरंग’ या विशेष कार्यक्रमाचे.

इ.एम.एस. सभागृह बाल शिक्षण मंदिर, कोथरूड पुणे येथे आयोजित ‘रंग पांडुरंग या कार्यक्रमात ध्वनिफितीतील अभंग, भक्तिगीते सादर करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. रघुनाथ पणशीकर,आनंद भाटे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले. यावेळीसंगीत दिग्दर्शक प्रसाद जोशी, कवी मकरंद वळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मिलिंद कुलकर्णी यांच्या सुत्रसंचालनासह सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ गायक, पं.हृदयनाथ मंगेशकर यांचे शिष्य किशोर कौशल यांच्याअधीर अधीर मन या भक्तीगीताने झाली. त्यानंतर पं.रघुनंदन पळशीकर यांनी एकच ध्यास लागे ‘ हा अभंग सादर केला, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी पांडुरंग भेटायला वारकरी हा चालला आणि मंजुषा पाटील यांनी तुझ्या भेटी लागी जीव होई कासावीस’ ही भक्तिगीते सादर केली. सुश्राव्य संगीत आणि भक्तिमय वातावरणाने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच या प्रसंगी रंग पांडुरंग या ध्वनिफितीचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आनंद भाटे यांनी वैष्णवांचे माहेर’ ही रचना सादर करत रसिकांची मने जिंकली, तर मंजुषा पाटील यांनी नको नको कान्हा ही गवळण सादर करत आपल्या गायकीने उपस्थितांना मोहित केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी अवघा रंग झाला रंग पांडुरंग ही पांडुरंगाची आरती सादर करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.