सरकारचे कामगार हिताकडे दुर्लक्ष: डॉ. रत्नाकर महाजन

Share this News:

पिंपरी, पुणे (दि. 2 मे 2018) केंद्रातील मोदी सरकारचे चार वर्षांपासून कामगार हिताकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल प्लागबाबत विचार करून धोरण आखले होते. काँग्रेसने सर्वसामान्यांचा बारकाईने विचार धोरण ठरवून आपल्या सत्तेच्या काळात अमंलबजावणी केली. धोरणात्मक निर्णयामुळेच पुण्याजवळ असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठे उद्योग, कारखाने उभे राहिले. यामुळे अल्पावधीत उद्योगनगरी म्हणून शहराची ओळख निर्माण झाली. हजारो हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. परंतु बदलत्या धोरणामुळे आणि केंद्र-राज्यातील भाजपाच्या चार वर्षाच्या सत्ता काळात उद्योग-व्यवसायांचे धोरण ठरविताना कमालीच्या चुका झाल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. अशा परिस्थितीत कामगार दिन कसा साजरा करणार असा प्रश्न पडतो, अशी खंत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्ला काँग्रेसच्या वतीने मंगळवार (1 मे) कामगार दिनानिमित्त जनसंवाद अभियानाचा प्रारंभ डॉ. महाजन यांच्या हस्तेपिंपरी काळेवाडी येथेकरण्यात आला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश काँग्रेस सदस्य संग्राम तावडे तसेच राजेंद्रसिह वालिया, शहर सरचिटणीस सज्जी वर्की, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, हरिदास नायर, अमीन आसवानी, सुदाम ढोरे, नंदा तुळसे, सचिन कोंढरे, सुनील राऊत, किशोर जगताप, सिद्धार्थ वानखेडे, चंद्रशेखर जाधव, आशिष नायडू, दीपक जाधव, बाबा बनसोडे, विजय ओव्हाळ, विठ्ठल खोपकर, माधव पुरी, व्यंकट जाधव, कुंदन कसबे, भाऊसाहेब मुकुटमल आदी उपस्थित होते.

डॉ. महाजन पुढे म्हणाले की, सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. राखीव वर्गातील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये रोज नवा ‘विनॊद’ ऐकायला मिळतो. सकाळी काढलेला एखादा आदेश संध्याकाळी पुन्हा मागे घेऊन आपलेच निर्णय फिरवण्याची नामुष्की या खात्यावर येते. 29 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटींचे कर्ज माफ केले असे सरकार उरबडवुन सांगते, परंतु प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे प्रसार माध्यमांमधून वेळोवेळी समोर आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता भाजपाकडे येऊन एक वर्ष झाले. मात्र, सत्तेवर येताना दिलेली आश्वासने सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. अनधिकृत बांधकामांचा, शास्तीकराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. विकासात्मक योजना शहरात सुरु होऊ शकलेल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच एक विधान केले, 28 एप्रिल हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल कारण संपूर्ण देशात वीज पोहचली आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच देशातील 97 टक्के खेड्यांमध्ये वीज पोहोचवली होती. अजूनही महाराष्ट्रातील नंदुरबार, सातारा जिल्ह्यातील अंतर्गत भागातील काही खेडी अशा गावांमध्ये अंधार आहे. आणि सरकार सांगत आहे 18 हजार खेड्यात उजेड पाडू. मोदी सरकार प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणार, रोजगार निर्मिती करणार, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे सांगत होते. परंतु, प्रत्यक्षात कॊणतेही आश्वासन सरकार पूर्ण करू शकले नाही.

प्रास्ताविकात सचिन साठे म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत जेएनयूआरएम अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेस हजारो कोटींचा निधी अनुदान म्हणून मिळाला. यामधून रस्त्यांची कामे, सर्वसामान्यांसाठी ईड्ब्लूएस, घरकुल योजना, रस्ते, पाणी अशी कामे करण्यात आली.

मोदी सरकारने पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत उशिरा समावेश केला. शिवाय योजना राबविण्यासाठी जाचक अटी लादल्या आहेत. दरवर्षी 100 कोटी देण्याचे आश्वासन दिले प्रत्यक्षात चार वर्षात केवळ 25 कोटी रुपये देऊन पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची बोळवण केली. सत्ताधाऱ्यांचा हा सर्व प्रकार म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा उद्योग आहे, अशी टीका सचिन साठे यांनी केली.
स्वागत सज्जी वर्की , सूत्रसंचालन मयूर जयस्वाल तर आभार नरेंद्र बनसोडे यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.