सर्व महापालिका कामगार प्रतिनिधींची शनिवारी पिंपरीत राज्यस्तरीय बैठक

Share this News:

पिंपरी, पुणे (दि. 07 जून 2018) महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेतील कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी (दि. 9 जून) पिंपरी (पुणे) येथे आयोजित करण्यात आली असल्याचे पत्रक पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

शनिवारी सकाळी 10:30 वाजता पिंपरी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृह, पिंपरी, पुणे येथे कामगार नेते बबन झिंजुर्डे, रवी राव, शशांक राव आणि राज्यातील विविध मनपा कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीत हि राज्यस्तरीय बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल व प्रस्तावित बदल, आकृतीबंद, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अनुकंपा / वारसा हक्क धोरणातील जाचक अटी रद्द करणे, रिक्त व पदोन्नती पदे भरणे, कंत्राटीकरण – खाजगीकरण, कंत्राटी कामगारांना कायम करणे, समान कामाला समान वेतन देणे. या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन आगामी काळात कामगार संघटनांचा राज्यव्यापी लढा उभारण्याबाबत ठराव मंजूर करुन ध्येय धोरणे आखण्यात येणार आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली आहे.