सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज – नितीन गडकरी

Share this News:

दिनांक: ८. सप्टेंबर २०१७ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे असे केंद्रीय रस्ते महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. ८ सप्टेंबर) पुण्यात सांगितले. भोसरी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सी.आय.आर.टी.) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री.गडकरी पुढे म्हणाले की, देशात पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी ठरू शकणाऱ्या जैव इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यापुढील काळात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर अधिकाधिक करण्यावर भर देण्यात येणार आहे.

      आयातीला पर्याय ठरू शकणारे, प्रदूषणमुक्त किफायतशीर देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सरकारचे धोरण आहे असेही त्यांनी सांगितले. सी.आय.आर.टीचे संचालक कॅप्टन राजेंद्र सानेर पाटील, खारदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी एका स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी “सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूकव्यवस्था” या विषयावर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध तज्ञांनी भाग घेतला.