​​‘संगीताचे सात स्वर जगाला जोडतात’

Share this News:

पुणे, ८ सप्टेंबर २०१७ : ‘’भाषा वाचावी आणि समजून घ्यावी लागते, तर संगीत अनुभवायचे असते. मी संगीताच्या जगात राहतो हे माझे भाग्यच आहे. संगीताच्या सात स्वरांनी जगाला एकत्र जोडले आहे. भाषेचा मी आदर करतो, परंतु काही वेळा भाषा कुंपणे निर्माण करते,’’ असे मत ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी व्यक्त केले.

‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’ या प्रामुख्याने इंग्रजी साहित्याला वाहिलेल्या संमेलनाचे उद्घाटन अमजद अली खाँ यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

लेखिका व संमेलनाच्या आयोजिका डॅ. मंजिरी प्रभू, ‘माईर्स एमआयटी’चे संस्थापक विश्वनाथ कराड, विश्वकर्मा पब्लिकेशनचे भरत अगरवाल, सल्लागार समितीचे सदस्य अशोक चोप्रा, लेखक व माहितीपट निर्माते डॉ. नील हॉलंडेर या वेळी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर ‘युवर्स ट्रुली -उस्ताद अमजद अली खाँ’ या कार्यक्रमात मिली ऐश्वर्या यांनी उस्ताद अमजद अली खाँ यांची मुलाखत घेतली. ‘‘लहानपणापासून माझ्या आजूबाजूची सर्वच मंडळी संगीतकार होती. आपल्या सर्वांचा देव आणि वंश एकच आहे, ही शिकवण मला माझ्या वडिलांनी दिली. सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनी हीच शिकवण द्यायला हवी असे मला वाटते. निसर्गातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे संगीताला कोणताही धर्म नाही,’’ असे अमजद अली खाँ यांनी सांगितले.

‘’लोकांना जेव्हा लोकप्रियता प्राप्त होते तेव्हा ते केवळ स्वत:विषयी बोलतात. आपल्या गुरूंचा उल्लेख करण्यास विसरतात. परंतु गुरूवर श्रद्धा नसलेला शिष्य आपले लक्ष्य साध्य करू शकत नाहीत,’’ असेही ते म्हणाले.

परदेशी संगीतात काम करण्याचा आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘’आपण संधी मिळेल तेव्हा लगेच परदेशी संगीताला नावे ठेवतो. पण त्यांच्याकडेही चांगल्या गोष्टी आहेतच. अनेक प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकारांच्या रचना मी लहानपणापासून ऐकल्या आहेत. दीडशे संगीतकार एकत्र येऊन उत्तम संगीत तयार करतात हे पाहून मला आश्चर्य वाटत असे. आपल्या देशात दीडशे संगीतकार एकत्र आले असते तर एकमेकांची डोकी फुटली असती! आपल्याकडे कधी ऑर्केस्ट्रा तयारच झाला नाही. दुसऱयाच्या हाताखाली काम करणे आपल्याला पसंत नसते. त्यांच्याकडे एका ‘कंडक्टर’च्या हाताखाली इतर संगीतकार काम करतात. त्यांची ही संस्कृती मला आवडते.’’

यावेळी बोलताना डॉ. प्रभू म्हणाल्या, “पुण्यासारख्या समृद्ध शहरात एक हक्काचे असे साहित्य संमेलन असावे या उद्देशाने चार वर्षांपूर्वी आम्ही पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलला सुरवात केली. प्रसिद्ध लेखकांशी वाचकांचा थेट संवाद व्हावा आणि वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन मिळावे असा या संमेलनाचा उद्देश आहे,’’

नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी पीआयएलएफ आणि विश्वकर्मणा पब्लिकेशन्स यांच्या सहकार्याने संहिता लेखनाची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी मागील वर्षीच्या विजेत्यांचा सत्कार उस्ताद अमजद आली खां यांच्या हस्ते कारण्यात आला याबरोबरच यावर्षीच्या विजेत्यांची देखील घोषणा करण्यात आली.

उद्या शनिवार दि. ९ सप्टेंबर आणि रविवार दि १० सप्टेंबर बाणेर रस्तावरील यशदा येथे सकाळी १० वाजल्यापासून हा महोत्सव सुरु असणार आहे. यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.