स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या मोबाईलवरच्या नो-NO ऍप चे पुण्यात अनावरण

Share this News:

पुणे, १२ फेब्रुवारी २०१८ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रोग्राम फॉर प्रायमरी प्रिवेंशन ऑफ़ सेक्सुअल व्हायोलन्स (PPPSV-पीपीपीएसव्ही) कार्यक्रमाचा भाग असलेल्या नो(NO) या ऍप चे उद्घाटन केले. या ऍप चा उद्देश भारतातील स्त्रिया व मुलांवरील लैंगिक हिंसा रोखणे हा असून के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे; शारीते येथील बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी; आणि भारतातील तज्ज्ञांचे सल्लागार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा कार्यक्रम आहे.

या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, लैंगिक हिंसा ही आपल्या जगातील एक कठोर वस्तुस्थिती आहे. फक्त स्त्रिया किंवा एका विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींविरुद्ध घडणारी तुरळक घटना नाही, तर ते एक सामाजिक वास्तव आहे. लैंगिक हिंसेमुळे निरनिराळे मानसिक आणि मनोकायिक आजार उद्भवतात. म्हणून सर्व समाजाला ग्रासून टाकणारी ही एक सार्वजनिक आरोग्यासाठीची समस्या आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील लैंगिक हिंसा टाळण्यासाठी समाजाचाच धाक उपयोगात आणण्यासाठी निर्माण केले गेलेले नो NO हे ऍप आहे. ‘NO’ ऍप सारखे महत्वाचे उपक्रम हा लैंगिक हिंसेचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्तींचा सहभाग घडवून आणत आहेत, यागोष्टीचा मला आनंद आहे.

त्या पुढे म्हणल्या की, मला असे सांगण्यात आले आहे की ह्या प्रकल्पावर काम करणारी टीम ही ‘प्रतिसाद’ आणि अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर यांच्या माध्यमातून पोलिसांबरोबर काम करीत आहे. त्यामुळे लैंगिक हिंसेच्या भीतीने त्रस्त झालेल्या लोकांचे संकटकाळी मदत मागण्यासाठीचे कॉल हे कार्यक्षमपणे आणि परिणामकारकरीत्या हाताळता येतील. म्हणून ‘NO’ ऍप ही खरोखर कठीण काळची नड भागवणारी गरजेची गोष्ट आहे.”

डॉ. क्लाउस बैअर हे शारीते, बर्लिन येथील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी and सेक्शुअल मेडिसिन येथे संचालक प्राध्यापक आहेत. त्यांनी पीपीपीएसव्ही कार्यक्रमाची उद्दिष्टे विशद केली. “भारतात लैंगिक हिंसा घडूच नये, तिला प्राथमिक प्रतिबंध करता यावा, म्हणून वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित मार्गाने काही पद्धतींचा विकास करणे, हे पीपीपीएसव्ही चे ध्येय आहे. ‘लैंगिक हिंसेला प्राथमिक प्रतिबंध’(पीपीपीएसव्ही) या कार्यक्रमाचा गाभ्याचा भाग म्हणजे स्त्रिया आणि मुलांना कुठल्याही धक्कादायक अतिप्रसंगाला तोंड द्यावेच लागू नये, अशा अतिप्रसंगांपासून त्यांचे परिणामकारक संरक्षण करता यावे, यासाठी नाविन्यपूर्ण असे मार्ग आणि उपाय शोधणे हा आहे. प्राथमिक प्रतिबंध म्हणजे घटना घडण्यापूर्वीच ती थांबवणे. यामुळे स्त्रिया आणि मुलांचे लैंगिक शोषणापासून आणि त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांपासून संरक्षण करणे, हे साध्य होतील.”

‘NO’ ऍप हे अतिप्रसंगाच्या घटनांचे प्रत्यक्ष ठिकाण शोधून, नोंदवून ते प्रसृत करण्याच्या प्रक्रियेवर आणि पद्धतींवर आधारित आहे. सध्याच्या मोबाईल तंत्रज्ञानामुळे हे सगळे सोपे झाले आहे. विनयभंगाचा धोका किंवा प्रत्यक्ष अतिप्रसंगाच्या घटनेमध्ये ‘NO’ ऍप वापरणाऱ्यांना ‘संकट आले आहे’, किंवा ‘धोका वाटतोय’, असा संदेश मोबाईलवरच्या एका आयकॉन किंवा बटणाला स्पर्श करून क्षणार्धात पाठवता येतो. अशा इतर ‘NO’ ऍप धारण करणाऱ्या जवळपासच्या परिसरातील मोबाईलधारकांना हा संदेश तत्क्षणी मिळेल, शिवाय अशा घटनेचे ठिकाणही कुठे आहे ते समजेल. या कार्यपद्धतीमुळे समाजाचा वचक वाढून अशा घटनांवर नियंत्रण येईल.

‘प्रतिसाद’ या ऍप च्या माध्यमातून ‘NO’ ऍप हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर सहकार्य करीत आहे. अशा रीतीने प्रत्येक संकटाचा इशारा देणारा संदेश – घटनेच्या ठावठिकाण्यासाहित पोलिसांना तत्क्षणीच मिळेल. यामुळे पोलिसांना गस्तीवरच्या अधिकाऱ्यांना नेमक्या ठिकाणी लगेचच पाठवणे शक्य होईल. याशिवाय एक अहोरात्र काम करणारे कॉल सेंटर संकटाचा इशारा देणारे कॉल तत्पर कार्यक्षमतेने हाताळत असेल.

रिचर्ड व्हान डेर मेर्वे, हे दक्षिण आशियातील बायर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “‘NO’ ऍप हे लैंगिक हिंसेला समाजाने दिलेले उत्तर आहे. यामुळे सार्वजनिक दृष्टीकोणात गुणात्मक फरक पडणार आहे. आपण अतिप्रसंगाला बळी पडलेल्यांना शरमिंदे वाटवणे, किंवा गुन्हेगारांना निव्वळ दोषी ठरवणे, यांच्या पलीकडे जाऊन विचार करायला प्रवृत्त करीत आहोत.

समस्येला उत्तर शोधताना समाजाचा सक्रीय सहभाग मिळवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. स्त्रियांच्या मनातील सुरक्षिततेची भावना वाढवण्याची आकांक्षा ठेवणाऱ्यांना बळ देणे, आणि शक्यतेच्या कोटीतल्या गुन्हेगारांना निःशस्त्र करणे, अशा दोन्ही गोष्टी यातून साध्य होतील. ‘NO’ ऍप हे एक निव्वळ मोबाईल अप्लिकेशन न राहता, ते लैंगिक छळाला सामना करण्यासाठी यूजर्सना एकमेकांना आधार देणारे माध्यम ठरेल. बायर कंपनीसाठी सामाजिक उपक्रम ही फक्त एक जबाबदारी नसून समाजाला सहभागी करून घेण्याचे ते एक माध्यम आहे. आजवर आमचे कॉर्पोरेट सोशल एंगेजमेंटचे कार्यक्रम भारतातील पंधरा राज्यांमध्ये राबवले जात आहेत. त्यासाठी आमचे सुमारे पंधरा कोटी रुपये इतके बजेट असून सुमारे एक लाख पस्तीस हजार लाभार्थी आहेत.”

जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मान प्राप्त झालेले आणि प्रसिद्ध नट व मानसोपचार तज्ज्ञ, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे हे पीपीपीएसव्ही च्या सल्लागार मंडळाचे एक सन्माननीय सभासद आहेत. त्यांनीही उद्घाटन समारंभात सहभाग घेतला. NO ऍप ला ठामपणे पाठिंबा देताना ते म्हणाले की त्यांच्या या सहभागाने स्त्रिया आणि मुले यांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात हा आणखी एक पुरुष सामील झाला आहे.