फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई व्हावी – आ.जयंत पाटील

Fergusson College
Share this News:

मुंबई – दि-29 : फर्ग्युसन महाविद्यालयातील घटनेप्रकरणी विरोधक आज विधानसभेत आक्रमक झाले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत प्राचार्य २४ तासात तीन वेगवेगळी पत्रे लिहितात. पहिल्या पत्रात देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या आणि विद्यार्थ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी करतात. दुसऱ्या पत्रात तसे काही झालेच नाही असे सांगत पहिले पत्र मागे घेतात, तर तिसऱ्या पत्रात पुन्हा कारवाईची मागणी करतात. याचा अर्थ हे प्राचार्य कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत, हे स्पष्ट होत असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. विशिष्ठ विचारसरणीची रीफर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य ओढत आहेत, असा आरोप त्यांनी केला. एका जबाबदार प्राचार्याचे असे वागणे योग्य नसल्याने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ते फर्ग्युसन महाविद्यालयात गेले असताना हल्ला झाला पण हल्ला करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. याचेही मुख्यमंत्री समर्थन करतात याचा अर्थ काय? असा प्रश्न पाटील यांनी केला. सभागृहात काळ्या फिती हातावर बांधून विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. प्राचार्यांवरील कारवाईच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने तब्बल तीन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.