केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार विजयी

Share this News:

मुंबई – दि.19 :: आज निवडणुक निकाल जाहीर झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले असून या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडी केली होती. आता डावे पक्ष सत्तेत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही केरळमध्ये सत्ताधारी पक्ष झाल्याचे समाधान तटकरे यांनी व्यक्त केले. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी ४,८९१ मतांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए.के.ससींद्रन यांनीही जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल २९ हजार ५७ मतांनी पराभव केला. या विजयाबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.

सध्या निवडणुका झालेल्या पाच राज्यातील निकालांवरून प्रादेशिक पक्ष मजबूत होत असल्याचे समोर आले आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी घवघवीत यश संपादित केले. तामिळनाडूमध्येही जयललिता यांनी सत्ता राखली. हा एक ऐतिहासित विजय असल्याचे तटकरे म्हणाले. तामिळनाडूमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होते. पण यावेळी तसे झाले नाही. केरळ मध्ये मात्र पाच वर्षांनी सत्तांतर होण्याची परंपरा कायम राखली गेली आहे. तसेच पाच राज्यात केवळ आसाम मध्ये भाजपला यश मिळाले आहे. पण या निवडणुकीतून ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांना नगण्य यश मिळाले आहे, हे दिसून आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणूकांमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे. तोच अनुभव या पाच राज्यांच्या निवडणुकांतून आल्याचे तटकरे म्हणाले.