“पोस्टमन मोबाईल ॲप” सेवा देशभरात लागू

Share this News:

मुंबईतही आज भांडुप पूर्व टपाल कार्यालयात पेास्टमन मोबाईल ॲपचे उद्‌घाटन

मुंबई, 10 जून 2016 :: स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा करुन घेण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने “पोस्टमॅन मोबाईल ॲप” सुरु करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते नुकतच छिंदवाडा येथे या सेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील मुंबईतही भांडुप येथे या मोबाईल ॲपचे आज प्रायोगिक तत्वावर उद्‌घाटन करण्यात आले. टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के.दास यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र टपाल विभागाची वर्ष 2015-16 तील कामगिरी आणि भविष्यातील नवीन उपक्रम याविषयीही या परिषदेत माहिती देण्यात आली. मुंबईतील भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या 18 पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहे, ज्यामध्ये पोस्टमॅन ॲप चा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्तांक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हर मध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आहेत.

व्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक कार्यान्वयन या माध्यमातून सरकारला 2015-16 मध्ये एकूण 1675 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसूलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचा एकूण टपाल कार्यान्वयन महसूल 953 कोटी रुपये इतका आहे, असे दास यांनी यावेळी सांगितले. ई-कॉमर्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता परळ येथे एक समर्पित यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे, असेही दास म्हणाले. 12000 चौरस फुटावर विस्तारलेल्या या केंद्राची दररोज 30,000 पार्सल इतकी क्षमता आहे. याशिवाय महाराष्‍ट्र टपाल विभागाने ऐरोली येथे 4000 चौरस मीटर क्षेत्रावर ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र विकसित करण्याचा संकल्प केला आहे. तसेच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विभागाकडून ई-कॉमर्स, स्पीड पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, मिडीया पोस्‍ट, बिझनेस पेास्ट, बिल मेल सेवा, एक्सप्रेस पार्सल पोस्ट आणि डायरेक्ट पोस्ट  आदी सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व 17 व्यवसाय टपाल केंद्र आणि 35 विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु करायला मंत्रिमंडळाने 1 जून 2016 रोजी मंजूरी दिली आहे. त्यानुसार आज “माय गव्ह” वेबसाईटवर लोगो डिझाईन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरु करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.