चौथ्या सिंधू नृत्य महोत्सवाला ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने सुरुवात
पुणे, दि. ३ मार्च, २०१८ : छत्रपती शिवाजी महाराज, यांचा कर्मयोग, स्वराज्यारोहण, त्यांचा आंतरिक संघर्ष आणि त्या वेळची सामाजिक परिस्थिती नाट्याविष्कारा माध्यमातून आज पुणेकरांनी अनुभविली… निमित्त होते सांख्य डान्स कंपनी आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स यांच्या वतीने आयोजित सिंधू नृत्य महोत्सवातील ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराचे.
शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून पुणे शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. महोत्सवाचे हे सलग चौथे वर्ष असून स्वत: वैभव आरेकर यांनी साकारलेल्या ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली.
या नाट्याविष्कारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींचे सादरीकरण भरतनाट्यमच्या माध्यमातून उपस्थितांच्या समोर सादर करण्यात आले. यामध्ये मुख्यत: शिवाजी महाराज आणि त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक चित्र कलाकारांनी उभे केले. याबरोबरच शिवरायांच्या जन्मा अगोदर राज्याची असलेली परिस्थिती, त्यांचा जन्म, स्वराज्याची शपथ, स्थापना, महाराजांचा राज्याभिषेक, त्यांचे सत्तारूढ होणे यांबरोबरच त्यांचा आंतरिक व आध्यात्मिक संघर्ष आणि मुख्यत: ‘कर्मयोगी’ शिवाजी महाराज दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लयबद्ध सादरीकरण आणि उत्कृष्ट प्रकाशयोजना यांचा सुंदर मिलाप यावेळी पहायला मिळाला. याबरोबरच महेश वाळुंज यांच्या ‘बीप महाराज की जय’ या लघुनाट्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
