ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा वाढविण्यासाठी महावितरणचे उपक्रम

Share this News:

पुणे, दि. 21 : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील वीजग्राहकांनी ऑनलाईनद्वारे जास्तीतजास्त वीजबिलांचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून जागर सुरु करण्यात आला आहे. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याबाबतचे फायदे वीजग्राहकांना पटवून देण्यात येत आहेत. हा उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले असून ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी व त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या घरगुती किंवा इतर वीजबिलांचा भरणा फक्त ऑनलाईनद्वारे भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधित कार्यालयप्रमुखांकडून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठविण्यात आल्या आहे. याशिवाय महावितरणचे सर्व ग्राहक सुविधा केंद्ग तसेत वीजबिल भरणा केंद्गात रांगेत असलेल्या वीजग्राहकांशी संवाद साधून मोबाईल अ‍ॅप, वेबसाईटद्वारे ऑनलाईन वीजबिल भरण्याच्या प्रक्रियेची व त्याच्या फायद्याची माहिती देण्यात येणार आहे.

शहरी भागात धनादेशाद्वारे वीजबिल मोठ्या प्रमाणात भरण्यात येत आहेत. धनादेशाद्वारे वीजबिल भरणार्‍या वीजग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीजबिलांचा भरणा ऑनलाईनद्वारे करण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. तसेच महावितरण ग्राहक संपर्क अभियानामार्फत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, इतर कार्यक्रम, आठवडी बाजार तसेच शहरी भागातील मोठमोठे घरगुती, व्यापारी संकुल आदी ठिकाणी महावितरण मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणे, अ‍ॅपद्वारे वीजबिल भरणा व इतर सेवांची माहिती देणे, मोबाईल क्रमांकाची नोंदणी याबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय महावितरणचे सर्व उपविभाग व शाखा कार्यालय, वीजबिल भरणा केंद्ग, ग्राहक सुविधा केंद्ग आदी ठिकाणी ऑनलाईन वीजबिल भरणाबाबत वीजग्राहकांना विशेषत्वाने माहिती देण्यात येणार आहे.

चौकट – ऑनलाईन वीजभरणा आता निःशुल्क क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनचे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे. रांगेत उभे राहण्याऐवजी आता कुठूनही वीजबिल भरणा करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसलेल्या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.