पिंपरी ते निगडी, नाशिकफाटा ते चाकण मेट्रो प्रकल्पाचा अहवाल वेगात करा : आमदार महेश लांडगे
पिंपरी, 16 जुलै – पुणे महामेट्रोने स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रोचा डीपीआर बनविण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, ते अतिशय संथ गतीने सुरु आहे. नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रोचा ‘डीपीआर’ नव्याने समाविष्ट करावा. त्याच्यावर वेगात कारवाई करावी, अशी मागणी भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
नागपूरातील पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे आमदार महेश लांडगे यांनी नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावरील मेट्रोच्या डीपीआरकडे सरकारचे लक्ष्य वेधले. आमदार लांडगे म्हणाले, पुणे महामेट्रोने स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या विस्तारीत मेट्रो मार्गाचा एकूण 24 किलोमीटर लांबीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पंरतु, हा डीपीआर अद्यापही पुर्ण झाला नाही. हा डीपीआर लवकर पुर्ण करण्यासाठी मी वारंवार पाठपुरावा करत आहे. परंतु, त्याला विलंब होत आहे.
नाशिक फाटा ते चाकण या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यासाठी नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा डीपीआर त्वरित बनविण्यात यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.
