आयुर्वेद जा गतिक पातळीवर विकसित व्हावे
पुणे : “आयुर्वेद क्षेत्रात बरेच वर्षे काम करत असून, आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचविणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विकसित करण्यासाठी भारतीय आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार महत्वपूर्ण आहे,” असे मत नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदाचे संचालक डॉ. एटीयन प्रेमदानी यांनी व्यक्त केले.
वैद्य हरिश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशायुर्वेद’ या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ. एटियन प्रेमदानी बोलत होते. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे, बीव्हीजी इंडियाचे संचालक हणमंतराव गायकवाड, वैद्य अतुल राक्षे व वैद्य विक्रांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते डॉ. एटीयन प्रेमदानी यांना
‘केशायुर्वेद गौरव’, डॉ. स्नेहल पाटणकर यांना
‘केशायुर्वेद रत्न’, डॉ. आस्मा इनामदार आणि डॉ. गायत्री पांडव यांना
‘केशायुर्वेद भूषण’, डॉ. भूषण देव स्वप्नील महाजन, भाग्यश्री सेवेकरी, शीतल त्रिवेदी, काजल शहा, रिचा अगरवाल यांना
‘केशायुर्वेद मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘केशायुर्वेद’च्या गुजराती आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर
‘आयुर्वेदीय जीव रक्त परीक्षण’ या विषयावर डॉ. एटीयन प्रेमदानी आणि वैद्य हरीश पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. एटीयन प्रेमदानी म्हणाले, “
सध्या जगभरात आयुर्वेदाला विशेष मागणी आहे. दिवसेंदिवस लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाला मोठ्या संधी आहेत. या संधींचा लाभ आपण सर्वानी घेत आयुर्वेदाला पुढे नेले पाहिजे.”
वैद्य हरिश पाटणकर प्रास्ताविकात म्हणाले, “अल्पावधीत ‘केशायुर्वेद’ला जागतिक ओळख निर्माण झाली आहे. आज भारतात आणि भारताबाहेर ६५ उपकेंद्र उभारली आहेत. विविध पातळ्यांवर संशोधन करून केशायुर्वेदची संकल्पना सत्यात उतरली आहे.”
डॉ. अरुण जामकर म्हणाले, “बहुतांशी लोक अलोपॅथी सरावाकरिता आयुर्वेदामध्ये येतात व पारंपरिक आजारावर औषधे शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु वैद्य पाटणकर यांनी केसांच्या महत्वपूर्ण विषयावर काम सूरु केले आहे. केशायुर्वेदच्या माध्यमातून हे काम सुरु केले आहे.”
डॉ. सतीश डुंबरे, हणमंतराव गायकवाड, डॉ. अतुल राक्षे, डॉ. विक्रांत पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केले. ज्ञानेश्वर जाधवर व डॉ. काव्या हेब्बार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.
