अभिव्यक्तीच्या वतीने हॅपी टू ब्लीड अभियानाचे आयोजन

Share this News:

स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी त्यांना कुटुंबापासून, समाजापासून दूर करण्याच्या, मंदिरात प्रवेश नाकारण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. केरळमधील शबरीमला या मंदिराचे अध्यक्ष प्रयार गोपालाकृष्णन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्त्रियांचे समाजातील दुय्यमत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जोपर्यंत स्त्रियांना मासिक पाळी आली आहे की नाही असे सांगणारा स्कॅनर तयार झाल्यानंतर स्त्रियांना देवळात प्रवेश द्यायचा कि नाही याचा विचार करू, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातही एका महिलेने दर्शन घेतले म्हणून शनी-शिंगणापूर येथील शनिच्या चौथऱ्याला ग्रामस्थांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे शुद्धीकरण केले आहे. अशा अनेक घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत.

भारतीय राज्यघटनेला समता अभिप्रेत असतानाही आजही स्त्रिया समाजात दुय्यम स्थानी आहेत. पुरुषसत्ताक समाजामध्ये त्यांना साधे देवाचे दर्शन घेण्याचाही अधिकार नाही. हा मध्ययुगीन विचार टाकून देण्याऐवजी धर्म आणि परंपरा यांच्या नावाखाली त्यांचे समर्थन केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर हॅपी टू ब्लीड हे अभियान सुरू झाले आहे. त्याअंतर्गत अभिव्यक्ती या स्त्री-पुरुष लिंगभेदाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गटाच्या वतीने पुणे शहरामध्ये हॅपी टू ब्लीड मोहिम राबविण्यात येत आहे. गुरुवार, दिनांक ०३ डिसेंबर रोजी सायं. ६.३० वाजता नळस्टॉप, गुडलक चौक, कर्वेनगर चौक आणि संचेती रुग्णालय चौकात विविध महाविद्यालयातील तरुण-तरुणी हॅपी टू ब्लीड बाबत जनजागृती करणार आहेत.

तरी या अभियानाला आपण आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी आणि कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आपल्या समूहाचा वार्ताहर पाठवावा ही विनंती.