भाजपचे प्रदेश सचिव अजीज शेख यांच्याकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी
पिंपरी, दि. ९ भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झालेले चिंचवड, लिंकरोड येथील अजीज शेख यांच्याकडे सांगली जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी गेल्या महिन्यात अल्पसंख्यांक मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, प्रदेश संघटन महामंत्री रविंद्र भुसारी उपस्थित होते. यामध्ये विविध जिल्ह्यांमधून पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. सचिवपदी विविध भागातील १४ जणांची नियुक्ती करण्यात आली.
त्यात पिंपरी-चिंचवडमधून बांधकाम कामगार सेनेचे शहराध्यक्ष असलेले अजीज शेख यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी-चिंचवड शहरातून प्रथमच अल्पसंख्यांक समाजामधील कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने अल्पसंख्यांक समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता अजीज शेख यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
अजीज शेख म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकार देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा विकास अल्पसंख्यांक असणाऱ्या गटापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पक्षाच्या पदाचा उपयोग करणार आहोत. अल्पसंख्यांकांना भाजपची ध्येय धोरणे पटवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
