राज्यपालांचे अभिभाषण हे राज्यातील जनतेसाठी निराशाजनक – प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

Share this News:

राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र आहे. जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तसेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्रही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प मांडण्याआधी होणारे राज्यपालांचे अभिभाषण हे राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देणारे असेल, अशी आमची अपेक्षा होती. परंतु सरकारच्या कृतीचे प्रतिबिंब समजल्या जाणाऱे राज्यपालांचे अभिभाषण हे राज्यातील जनतेसाठी निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी दिली आहे.

यावेळी ते म्हणाले राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारच्या येणाऱ्या वर्षातील कृतीचा आराखडा आणि मागच्या वर्षी घेतलेल्या योजनांचा आढावा मांडला जायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र राज्यपालांच्या भाषणात कोणत्याही नव्या घोषणा नाही आहेत. जुन्याच योजनांचे नाव बदलून त्या पुन्हा जाहीर करण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरकारने केला आहे.

राज्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे.असे असताना ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्यासाठीही कोणत्याही नव्या उपाययोजना अभिभाषणात नव्हत्या. तसेच आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही लोकाभिमुख योजना होती. स्वच्छतेच्या कामात या योजनेचे मोठे योगदान होते. परंतु या योजनेचे नावही सरकारने बदलले आहे. एकूणच राज्यपालांचे अभिभाषण हे राज्यातील जनतेसाठी निराशाजनक ठरले आहे.