मुंबई, दि. 1 : नगरसेवकांकडे लाच मागणाऱ्या जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावे असे निर्देश सभापती रामराजे नाइक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. शुक्रवार दि.21 जून रोजी राखून ठेवलेल्या प्रश्नावर आज झालेल्या चर्चेच्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
अॅड. अनिल परब यांनी जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा आणि सदस्यांना निलंबीत करण्यात यावे या आशयाची मागणी केली होती. त्यावर, या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी पूर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॅा. सुरेश खाडे यांनी दिली. जुलै 2018 च्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. आज पुन्हा हा विषय उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
परभणी येथील जातपडताळणी समितीच्या श्रीमती वंदना कोचरे व इतर तीन अधिकारी यांच्याबाबतीतही भ्रष्टाचाराची तक्रार असल्याने त्यांचेही निलंबन करण्याची मागणी सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनी केली, त्यावरही निर्णय घेण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले.