हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार महेश लांडगे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Share this News:

भोसरी, 4 ऑक्टोबर – हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला. निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज जमा केला.

रॅलीमध्ये खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या उमा खापरे, सभागृज नेता एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, विलास मादीगेरी, बाळासाहेब गव्हाणे आदी प्रमुख उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी (दि. 4) शेवट मुदत होती. आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भोसरी मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण आहे. महायुतीच्या सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांच्या उमेदवारीचे स्वागत करत लांडगे यांचा उमेदवारी अर्ज भरला. सकाळी नऊ वाजता महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानावरून रॅलीला सुरुवात झाली. सनई, हलगीच्या कडकडाटात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात महेश लांडगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

जागोजागी फुलांचा सडा, फटाके यांची आतषबाजी करण्यात आली. वारकरी संप्रदायातील वारक-यांनीही लांडगे यांच्या या रॅलीत सहभाग घेतला. महिलांनी जागोजागी आमदार महेश लांडगे यांचे औक्षण केले. एकच वादा, महेश दादा, मना मनाने जपला रे, महेश दादा आपला रे अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

मंगळवारी (1 ऑक्टोबर) भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आमदार महेश लांडगे यांनी 2014 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी 15 हजारांच्या मताधिक्याने विजय विजय मिळवला होता. भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आमदार महेश लांडगे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.