Muslims demand Akhand Bharat for peace in India

Share this News:

पुणे ः ‘शांततेसह सहअस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि भारत हाच जगातील सर्वांत शक्तीशाली राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्व लष्करी उपाय योजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी’, असा ठराव आज पुण्यातील मुस्लीम समुदायाच्या संघटना, मौलवी, इमाम आणि मशिदीतील मुतवल्ली यांच्या बैठकीत करण्यात आला.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘अवामी महाज’ या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

मौलाना निजामुद्दीन (मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर), मौलाना अय्युब अश्रफी (अध्यक्ष, पुणे जिल्हा सुन्नी जमात), मुफ्ती अहमद हसन (ऑल इंडिया इमाम्स कौन्सिल), अनीस चि ​श्ती​ , (ज्येष्ठ अभ्यासक), डॉ. पी ए इनामदार (अध्यक्ष, अवामी महाज ), एस.बी.एच इनामदार, शेख चाँद सरदार, वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), लतीफ मगदूम (सचिव, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी), इक्बाल मुलाणी, शफी हसन काझमी, शेख शाहिद मुनीर, अब्दुल वहाब शेख हे मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी ‘आझम कॅम्पस’ येथे ही बैठक झाली.

यावेळी सर्वांनी आपल्या भाषणात अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला पाकिस्तानची दहशतवादी कृत्ये यांचा निषेध केला. ‘धार्मिक कट्टरता वादाचा निषेध आहेच; पण कोणीही त्याचा राजकारणासाठी उपयोग करू नये.’ असे अनीस चिश्ती म्हणाले.

‘सर्व धर्मांनी मानवता, सलोखा, शांततेचा संदेश दिला आहे. हत्या सर्व धर्मात निषेधार्ह आहेत. दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. बंधुभाव कायम राहिला पाहिजे.’ अशा आशयाच्या भावना सर्व वक्त्यांनी व्यक्त केल्या.

डॉ. पी. ए. इनामदार यांनी ठराव मांडला आणि उपस्थित सर्वांनी एकमताने तो मंजूर केला. शुक्रवारी पुण्यातील सर्व मशिदींमध्ये हा ठराव वाचून दाखवला जाणार आहे.
——————————————————–

बैठकीत संमत केलेला ठराव

आम्ही दि. १० जुलै रोजी जम्मू काश्मीर प्रांतात पवित्र अमरनाथ यात्रेस जाणाऱ्या भाविक यात्रेकरूंवर झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्यू पावलेल्या सात गुजरात व महाराष्ट्रातील व्यक्तिंना श्रद्धांजली अर्पित करीत आहोत, त्याचप्रमाणे मृतांच्या आत्म्यास चीर शांती लाभो या करीता ईश्वराकडे याचना करीत आहोत. मृतांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

भारताच्या सर्व सीमांवर शांतता झाल्याशिवाय आम्हा सर्व भारतीयांची चौफेर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होणार नाही याची जाणीव ठेवत आहोत. भारताच्या सीमा शांततामय न राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्कर, लष्करी सामुग्री व इतर बाबीवर गेली सत्तर वर्षे प्रचंड प्रमाणात खर्च करत आहोत. सदर खर्च वाढत असल्याने अनेक प्रगतीच्या योजना अमलात आणू शकलो नाही.

या करीता ब्रिटिशांनी पूर्व नियोजित कालानुसार भारताची फाळणी केली ही अनैसर्गिक होती व आहे, करीता आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना नम्र विनंती करत आहोत की सर्व लष्करी उपाय योजून पाकिस्तान, बांग्लादेश तसेच अफगाणिस्तान सह अखंड भारताची निर्मिती करावी, जेणे करून स्वातंत्र्यापूर्वी व नंतर भारतीय नेत्यांनी जी स्वप्ने पाहीली होती ती पूर्ण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल, असे घडल्यास भारतीय संस्कृतीचा शांततेचा सहअस्तित्वाचा संदेश कृती सह जगात अमलात आणता येईल.