Workshop for corporators about development works

Share this News:

विकासकामांसाठी नगरसेवकांची कार्यशाळा!

– आमदार महेश लांडगे यांच्या सूचना
– समर्थक नगरसेवकांची मोशीत बैठक

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रभावीपणे कामाला लागा. जनमानसांत भारतीय जनता पक्षाच्या विकासाचे ‘व्‍हीजन’ पोहोचले पाहिजे. लोकांना बदल दिसला पाहिजे. तरच आपल्यावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना दिल्या.
मोशी येथे आमदार लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांची महापालिका क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला भोसरीतील २५ ते २७ नगरसेवक उपस्थित राहिले होते. यावेळी नगरसेवकांनीही महापालिकेत काम करताना येणा-या अडचणी आमदार लांडगे यांच्यासमोर मांडल्या.
आमदार लांडगे म्हणाले की, महापालिकेत सत्ता मिळून तीन महिने झाले. महापालिकेचा अर्थसंकल्पही जाहीर झाला आहे. त्यामुळे आता अंग झाडून कामाला लागले पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि आपले काम लोकांना समजले पाहिजे. लांकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. याची जाणीव प्रत्येक नगरसेवकाने ठेवली पाहिजे. जोपर्यंत आपण लोकांची कामे निष्ठेने करीत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये आपली प्रतिमा निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहीजे. आपल्या प्रभागातील कोणकोणत्या विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली केली. त्या विकासकामांची सध्यस्थिती काय आहे? कोणाताही प्रकल्प हाती घेत असताना स्थानिक लोकांची भूमिका काय आहे? प्रशासकीय यंत्रणा कोणत्या प्रकारे काम करीत आहे? एखादा अधिकारी विकासकामांत दिरंगाई करीत असेल, तर मी स्वत: महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिका-यांची बैठक घेतो. मात्र, लोकांची कामे मार्गी लागली पाहिजेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कारणे चालणार नाहीत, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.
—————
नगरसेवकांना दिले शिस्तीचे धडे….
मोशीत झालेल्या बैठकीबाबत आमदार महेश लांडगे यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. बैठकीला आलेल्या सर्व नगरसेवकांचे मोबाईल फोन प्रवेशद्वारावर जमा करण्यात आले होते. पूर्णवेळ केवळ विकासकामे आणि पक्षाचे धोरण याबाबत चर्चा करण्यात आली. महापालिका सभागृहात बोलताना अभ्यास करुनच बोलले पाहिजे. सभागृहात होणा-या महत्त्वपूर्ण चर्चेत सहभागी झाले पाहिजे. त्यासाठी सर्व विभागाच्या अधिका-यांकडून प्रत्येक प्रकल्पाची माहिती समजून घ्या. सभागृहात प्रभागाचे प्रतिनिधीत्व करताना आपण कमी पडणार नाही, याची नगरसेवकांनी काळजी घ्यावी. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या माध्यमातून कामे करुन घ्या. नागरिकांच्या विश्वासाला तडा जावू देवू नका, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

—————

सत्तेत आहोत याचे भान ठेवा…
राज्यात मध्यावधी निवडणुकीचे ढग गडद झाले आहेत. महापालिका आणि राज्यात आपण सत्तेत आहोत. याचे नगरसेवकांनी भान ठेवावे. कोणत्याही विषयावर आपण विरोधात असल्यासारखे वक्तव्य नगरसेवकांनी करू नये. विकासकामे करुन घेण्याची जबाबदारी आपली आहे. मला लोकांनी अपक्ष निवडून दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही. महापालिका निवडणुकीत ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपला यश मिळणे सोपे नव्‍हते. पण, लोकांनी मोठ्या विश्वासाने भाजपला आणि आपल्याला संधी दिली आहे. त्याचे सोने करण्याची जबबाबदी विसरू नका, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी दिल्या आहे