‘ आधी कर्जमाफी जाहिर करा… नंतरच चर्चा…’
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधान परिषदेत
धनंजय मुंडे सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक
नागपूर, दि. 9 :- राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज पुढे सुरु ठेवणं, म्हणजे दुष्काळात होरपळत असलेल्या, मरणयातना भोगत असलेल्या जनतेची ती घोर प्रतारणा ठरेल, असे त्यांनी सांगितले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होताच, श्री. मुंडे यांनी राज्यातील दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईबाबत बोलण्यास सुरुवात केली. श्री. मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला एक वर्ष झालं. या काळात विधीमंडळाची तीन अधिवेशने झाली. प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा भरपूर झाली. पण, शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलं नाही. या चौथ्या अधिवेशनातही चर्चा करायची आमची तयारी आहे, परंतु आधी सरकारकडून, शेतकऱ्यांना नक्की काय मिळणार हे स्पष्ट होण्याची गरज आहे. शेतकरी दुष्काळानं मेताकुटीला आलाय, अधिवेशनाकडे अपेक्षेनं डोळे लावून बसलाय, त्या हतबल, असहाय शेतकऱ्यांची अपेक्षा, व्यथा मी या सभागृहात मांडतोय.
वर्ष 2015 च्या खरीप हंगामातल्या 15 हजार 700 गावातल्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाची मदत मिळाली नाही. हे अधिवेशन सुरु झाल्यानंतरही, 7 डिसेंबरला वर्धा जिल्ह्यातल्या झुनका गावातल्या विनायक जामुनकर या 27 वर्षांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. सावकारांकडचं कर्जमाफ करण्याची घोषणा करुनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. तो लाभ केवळ एक-दोन सावकरांपर्यंतच पोहचला. सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडण्या विकायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत, व सरकारही मदत जाहीर करीत नाही. हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर आता आता चर्चा नको, आधी कर्जमाफी नंतरच चर्चा अशी आपली ठाम भूमिका असल्याचेही श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले.
